चुरशीच्या लढतीत निजामपूरच्या सरपंचपदी सलीम पठाण विजयी

nijampur
nijampur

निजामपूर-जैताणे (धुळे) : येथील सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत ज्येष्ठ सदस्य सलीम पठाण यांची 9 विरुद्ध 8 मतांनी निवड झाली. आज (ता.8) दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड झाली. मंडळाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.चित्ते बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामविकास अधिकारी पी.बी. मोराणे, तलाठी प्रशांत माळी, युनूस सय्यद, भूषण रोजेकर, सुनील साळुंखे आदींनी सहकार्य केले.

कांटे की टक्कर...!
मुदत संपल्याने ठरल्याप्रमाणे साधना राणे यांनी 10 सप्टेंबरला राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही सरपंच निवड झाली. गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थांचे सरपंच निवडीकडे लक्ष लागून होते. सरपंचपदी सलीम पठाण यांच्या निवडीची घोषणा होताच समर्थक, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. त्यानंतर नवनिर्वाचित सरपंचांची गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली.

सरपंचपदासाठी दिलेल्या मुदतीत सलीम पठाण यांनी एक, तर जाकीर तांबोळी यांनी दोन अर्ज दाखल केले. जाकीर तांबोळी यांनी दोनपैकी एक अर्ज मागे घेतला. सलीम पठाण यांचे सूचक प्रवीण वाणी, तर जाकीर तांबोळी यांचे सूचक परेश वाणी होते. विशेष सभेस सर्व सतरा ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले. 

अखेरपर्यंत चुरस...
सलीम पठाण यांच्या बाजूने माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य अजितचंद्र शाह, दिलनूरबी सय्यद, रजनी वाणी, रवींद्र वाणी, प्रवीण वाणी, दीपक देवरे, सुनंदा बेंद्रे, कमलबाई मोरे आदी 9 सदस्यांनी मतदान केले. तर सरपंचपदाचे प्रतिस्पर्धी उमेदवार जाकीर तांबोळी यांच्या बाजूने परेश वाणी, साधना राणे, अनिता मोहने, सुनील बागले, इंदूबाई भिल, कासुबाई भिल, मालुबाई शिरसाठ आदी 8 सदस्यांनी मतदान केले. 

चाळिशीतील प्रतिस्पर्धी उमेदवार जाकीर तांबोळी यांनीही सलीम पठाण यांच्यापुढे मोठे आव्हान उभे करत अतिशय कडवी झुंज दिली. शेवटच्या क्षणापर्यंत ग्रामस्थांनी आपला श्वास रोखून धरला होता. निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल पाटील आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आता सर्व गावकऱ्यांचे निजामपूरच्या उपसरपंच निवडीकडे लक्ष लागून आहे.

"माझ्या रूपाने मुस्लिम समाजाला गावाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व सदस्य, गटनेते, मार्गदर्शक व कोअरकमिटी सदस्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करतो. आगामी काळात हिंदू-मुस्लिम एकोपा व गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहील."
- सलीमखां सर्फराजखां पठाण, नवनिर्वाचित सरपंच, निजामपूर ता.साक्री.

"शेवटपर्यंत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले सर्व सदस्य, माझे सर्व समर्थक, कार्यकर्ते, गटनेते, मार्गदर्शक, क्वालिटी ग्रुप व ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे."
- जाकीर लतीफ तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य, निजामपूर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com