संभाजी भिंडेंविरुद्ध खटल्याची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

नाशिक - 'माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो,' असा वादग्रस्त दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे व्हिडिओ तपासणीतून प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत. प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम समितीच्या 13 जुलैच्या बैठकीत भिडे यांच्यावर कारवाईचा निर्णय होणार आहे. दरम्यान, दोनदा नोटीस पाठवूनही भिडे यांच्याकडून नोटीस स्वीकारली जात नसल्याने न्यायालयीन खटला भरण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

संभाजी भिडे यांची 10 जूनला नाशिकमध्ये सभा झाली, त्यामध्ये "माझ्या शेतातील आंबे 180 पेक्षा जास्त लोकांना खायला दिले, त्यापैकी दीडशे जणांना मुले झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल,' असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. लेक लाडकी अभियानातर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे त्याविरोधात तक्रार करण्यात आली. महापालिकेने 22 जूनला स्पीड पोस्टाद्वारे सांगलीतील गावभागमधील पत्त्यावर नोटीस पाठविली. त्यादिवशी टपाल विभागाकडून पत्र घेण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीदेखील भेट होऊ दिली नाही. 25 जूनला कुटुंबीयांना पत्राची माहिती देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. तत्पूर्वी प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम समितीच्या बैठकीत भिडे यांच्या वक्‍तव्याचे व्हिडिओ चित्रण तपासण्यात आले. त्यात प्रथमदर्शनी भिडे यांनी केलेले वक्तव्य खरे असल्याचा निष्कर्ष समितीने काढला.

समिती ठरविणार भिडेंचे भवितव्य
महापालिकेतर्फे व्हिडिओ चित्रण तपासण्यात आले. त्यात प्रथमदर्शनी भिडे यांनी वक्तव्य केल्याचे आढळून आल्याची माहिती पी.सी.जी.एन.डी.टी. समितीचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत शेट्ये यांनी दिली. तसेच, भिडे यांच्याकडून चौकशीला प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम समितीच्या होणाऱ्या बैठकीच्या अनुषंगाने न्यायालयीन खटला दाखल करण्याची तयारी समितीने सुरू केली आहे. त्यामुळे भिडे यांच्याविरुद्ध कारवाईचे भवितव्य समिती ठरवेल, असे स्पष्ट होते.

Web Title: sambhaji bhide crime