आणखी तीन कायद्यांतर्गत भिंडेंविरुद्ध गुन्हे दाखल करा - अविनाश पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नाशिक - आंबा खाल्ल्याने मुले होतात, असा दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पण, निदान आणि उपचारासंबंधी वक्तव्य केले असल्याने त्यांच्याविरुद्ध चमत्कारी उपचारी दावा, वैद्यकीय उपचार आणि बोगस डॉक्‍टर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल व्हायला हवेत. तसेच, भिडे यांच्या प्रकरणात सरकारने ऍड. उदय वारुंजीकर यांची नेमणूक करावी, अशा मागण्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आज येथे केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 ऑगस्टला पाच वर्षे होतात. कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांचाही खून करण्यात आला आहे. हे खून करण्यांना, कट रचणाऱ्यांना अटक होत नाही. यात सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती, श्रीराम सेनेचे पदाधिकारी यांचा सहभाग आहे. असे असले, तरी सनातन संस्थेचे डॉ. जयंत आठवले यांच्याविरुद्ध कारवाई होत नाही. पनवेलच्या आश्रमात नशेची औषधे, कंडोम सापडलेत, पण कारवाई होत नाही. त्यामुळे 20 जुलैपासून 20 ऑगस्टपर्यंत "जवाब दो आंदोलन' सुरू करण्यात आले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: Sambhaji Bhide law crime Avinash Patil