संभाजी भिडेंना नोटीस कुठे पाठवावी?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

नाशिक - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाची चौकशी करण्यासाठी महापालिकेला आरोग्य संचालनालयाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर तातडीने चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात भिडे गुरुजींना महापालिकेकडून नोटीस पाठविली जाणार आहे; परंतु नोटीस पाठविण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांकडे भिडेंचा पत्ताच नसल्याने नेमकी नोटीस कुठे पाठवावी, या पेचात प्रशासन सापडले आहे.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी रविवारी (ता. 10) नाशिकच्या सभेत बोलताना, "माझ्या शेतातील आंबे 180 पेक्षा जास्त लोकांना खायला दिले. त्यापैकी दीडशे जणांना मुले झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल,' असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने लेक लाडकी अभियानातर्फे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना वक्तव्याची खातरजमा करण्यासाठी पत्र प्राप्त झाले.

त्यानुसार महापालिकेने कारवाई सुरू केली असून, चौकशीच्या पहिल्या टप्प्यात भिडे यांना नोटीस पाठविली जाईल. सभेला हजर असलेल्या काही लोकांचे जाबजबाब नोंदविण्याबरोबरच भाषणाची व्हिडिओ क्‍लिप तपासून बघितली जाईल. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान कायद्यानुसार चौकशी होणार असून, 18 जूनला या संदर्भात होणाऱ्या समितीच्या बैठकीत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी दिली.

वैद्यकीय विभागासमोर अडचणी
भिडे यांना प्रथमतः नोटीस पाठविली जाणार असून, त्यांच्याकडून उत्तर प्राप्त न झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भिडे यांच्या निवास किंवा कार्यालयाचा पत्ताच वैद्यकीय विभागाकडे नसल्याने नोटीस पाठवायची कुठे, असा प्रश्‍न संबंधितांना पडला आहे.

त्यासाठी पोलिस आयुक्तांकडे धाव घेण्यात आली आहे. जाबजबाब घेणे, व्हिडिओ क्‍लिप तपासणे किंवा नोटीस पाठविण्याचे काम पोलिस विभागाचे असताना, वैद्यकीय विभागाला पोलिसांचे काम करावे लागत असल्याने खातरजमा करताना अनंत तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: sambhaji bhide notice nashik municipal