समको बँक संचालक मंडळ बरखास्तीचा जिल्हा निबंधकांचा आदेश

bank
bank

सटाणा : संपूर्ण बागलाण तालुक्याची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या येथील बहुचर्चित सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेचे सत्ताधारी संचालक मंडळ अल्पमतात आल्याचे निमित्त साधून जिल्हा निबंधक गौतम बलसाने यांनी काल सोमवार (ता.५) रोजी संपूर्ण संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश बजावत बँकेच्या मुख्य प्रशासकपदी नांदगाव येथील सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांची नियुक्ती केली आहे.

बँकेच्या इतिहासात सत्ताधारी संचालक मंडळ कोणतीही पूर्वसूचना न देता थेट बरखास्त करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अत्यंत तातडीने झालेल्या या कारवाईमुळे ऐन दिवाळीत तालुक्यातील सहकार क्षेत्रात राजकीय भुकंप आला असून सभासदांमध्ये मात्र चलबिचल निर्माण झाली आहे.

याबाबतचे वृत्त असे, रविवार (ता.४) रोजी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बँकेच्या विद्यमान उपाध्यक्षांसह सत्ताधारी गटातील एक तर एकमेव विरोधी असे एकूण तीन संचालकांनी तडकाफडकी राजीनामे दिले होते. आज या राजीनामा नाट्यावर चर्चा सुरु असतानाच थेट विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश जिल्हा निबंधक गौतम बलसाणे यांनी दिले. विशेष म्हणजे येत्या सहा महिन्यात प्रशासकीय कारकीर्द संपण्याच्या आत नवीन संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचे आदेशदेखील बलसाणे यांनी दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी बँकेचे विद्यमान संचालक रमेश देवरे व अशोक निकम यांचे संचालकपद रोखे गुंतवणूक गैरव्यवहार प्रकरणी रद्द झाले होते. त्यांनी या विरोधात शासनाकडे दाद मागितली असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तर ऐन दिवाळीत उपाध्यक्षा कल्पना येवला, संचालक किशोर गहिवड व डॉ. व्ही. के. येवलकर यांनी एकाच वेळी राजीनामे दिले. यापूर्वी बँकेच विद्यमान अध्यक्ष राजेंद्र अलई, संचालक यशवंत अमृतकर, पंकज ततार व कैलास येवला या चारही संचालकांविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार अर्ज दाखल होता. मात्र त्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी नैसर्गिक न्यायतत्वानुसार दिली गेली नाही. हे देखील प्रकरण प्रलंबित असताना जिल्हा उपनिबंधकांनी त्यांचे पद रद्दबातल ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. आता १७ पैकी ९ संचालकांचे पद रिक्त झाल्याने सत्ताधारी गट अल्पमतात आला असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच हा बरखास्तीचा निर्णय झाला.

सत्ताधारी संचालक मंडळ अल्पमतात आलेले नाही. १७ पैकी २ संचालक अपात्र तर २ संचालकांनी राजीनामे दिले आहे. १३ संचालकांचे पूर्ण बहुमत असतांनाही सहाय्यक निबंधक गौतम बलसाणे यांना आम्ही अल्प मतात गेल्याचा जावईशोध कसा लागला ? या बरखास्ती प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडी झाल्या आहेत. नैसर्गिक न्यायतत्व धाब्यावर बसवून पूर्वग्रहदुषित एकतर्फी निर्णय झाल्याचे आमचे मत आहे. बलसाने यांची खातेनिहाय चौकशीची करून कारवाई व्हावी तसेच या आदेशाविरोधात आता आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.
- राजेंद्र अलई, अध्यक्ष, समको बँक

रविवार (ता.४) रोजी आपण बँकेच्या उपाध्यक्षपदासह संचालक पदाचा राजीनामा दिलेला नाही. राजकीय हेतूने कुणीतरी माझ्या स्वाक्षरीचा दुरुपयोग केला आहे. राजीनामा पत्रावर माझी स्वाक्षरी नाही. लवकरच सत्य जगासमोर येईल.
- कल्पना येवला, संचालक समको

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com