वाळूच्या डंपरने बालकाला चिरडले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

जळगाव - शहरातील अनेक भागांतून दररोज भरधाव वाहणाऱ्या वाळूच्या डंपरने आज निमखेडी रस्त्यावर एका तीनवर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. घटनेनंतर डंपरचालकाने गाडी सोडून पळ काढला; तर संतप्त जमावाने चिमुरड्याला चिरडणारा डंपरच पेटवून दिला. दरम्यान, घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार डंपरचालक सत्तर ते ऐंशीच्या भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात झाला. 

जळगाव - शहरातील अनेक भागांतून दररोज भरधाव वाहणाऱ्या वाळूच्या डंपरने आज निमखेडी रस्त्यावर एका तीनवर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. घटनेनंतर डंपरचालकाने गाडी सोडून पळ काढला; तर संतप्त जमावाने चिमुरड्याला चिरडणारा डंपरच पेटवून दिला. दरम्यान, घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार डंपरचालक सत्तर ते ऐंशीच्या भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी चालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात झाला. 

दरम्यान, या अपघातप्रकरणी दाखल गुन्ह्यात डंपरचालक दीपक सखाराम नन्नवरे (वय 30, रा. निमखेडी, ता. जळगाव) हा सायंकाळी उशिरा तालुका पोलिसांना शरण आला. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. मात्र डंपरमालक, ठेकेदाराविरुद्ध अद्याप कारवाई झालेली नाही. 

निमखेडी रस्त्यावरील कल्याणीनगरजवळ हितवर्धिनी सोसायटीमध्ये कैलास भदाणे हे कुटुंबासह राहतात. कैलास भदाणे हे आज सकाळी आपली रिक्षा पुसत होते. यावेळी त्यांचा मुलगा देवांश ऊर्फ दक्ष कैलास भदाणे (वाणी) (वय 3) हा घराबाहेर खेळत होता. त्याच वेळी देवांशचे काका विनोद भदाणे हे निमखेडी रस्त्याच्या पलीकडे कचरा टाकण्यासाठी गेले असताना देवांश त्यांच्या मागोमाग गेला. त्याचवेळी कचरा टाकून परत येताना काकाच्या मागे रस्ता ओलांडणाऱ्या देवांशला निमखेडीकडून शहराकडे येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपरने (क्रमांक- एमएच 19, वाय 3757) अरक्षशः चिरडून टाकले. डंपरचे मागचे चाक देवांशच्या कमरेच्या खालून गेल्याने त्याचे केवळ पायाचे बोट दिसत होते. घटना घडताच नागरिकांनी धाव घेत देवांशला तत्काळ रिक्षात टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्‍टरांनी एक तास देवांशचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, उपचारादरम्यान त्याचा अखेर मृत्यू झाला. 

जिल्हा रुग्णालयात गर्दी 
अपघात घडताच भदाणे परिवाराचे नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी देवांशचे वडील, आई, आजोबा, काका यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शवविच्छेदन झाल्यानंतर देवांशवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे निमखेडी परिसरात शोकाकूल वातावरण होते. देवांशच्या पश्‍चात वडील कैलास, आई अर्चना, आजी इंदूबाई भदाणे, आजोबा दगडू तसेच काका प्रदीप, शेखर, विनोद, चुलत भाऊ यश, धीरज असा परिवार आहे. 

संतप्त जमावाने डंपर पेटवला 
वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर, डंपरमुळे निमखेडी परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आज डंपरने एका लहान मुलाला चिरडल्याची घटना घडली. घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. चालकाने डंपर सोडून पळ काढला. त्याचवेळी संतप्त नागरिकांनी डंपरच्या काचा फोडून डंपरच्या कॅबिनला आग लावली. पोलिसांनी अग्निशमन विभागाला फोन लावून डंपरची आग तत्काळ विझविली. घटना घडल्यानंतर याच परिसरातील नागरिकांनी तालुका पोलिस स्टेशनला घटनेची माहिती दिली. परंतु एक सात उलटल्यानंतर पोलिस घटनास्थळावर आले. माहिती देवूनही पोलिस उशिरा आल्याने 
नागरिकांमध्ये रोष दिसून आला. 

निमखेडी रस्त्यावरील तिसरी घटना 
निमखेडी रस्त्यावरून दिवस-रात्र चालणाऱ्या वाळूच्या डंपरच्या जीवघेण्या खेळाला परिसरातील नागरिक कंटाळले आहे. या डंपरचालकांमध्ये कायम डंपर जोरात पळविण्याची जणू स्पर्धाच लागलेली असते. चालकांच्या बेदरकारपणे वाहने चालविण्याच्या वृत्तीने रस्त्यावरून जाणारे अन्य वाहनचालकही धास्तावल्याचे दिसून येते. यापूर्वी जुनी जैन फॅक्‍टरीजवळ तसेच निमखेडी रस्त्यावरील एका जागेवर दोन अपघातांत दोघांचा जीव गेला होता. त्यात आज तीन वर्षांचा देवांश भरधाव डंपरचा बळी ठरला. 

आजची घटना दुर्दैवी आहे. संबंधित ठेका फुपनगरी येथील असून, त्याच वाळूगटातून ही वाहतूक होत होती. असे असले तरी या वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहील, अशा सूचना करण्यात येतील. तसेच ही वाहने कोणत्या रस्त्यांवरून वापरतात? दिवस-रात्रीत किती फेऱ्या मारतात, याकडेही लक्ष ठेवण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. 
- किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी. 

Web Title: Sand dumper crushed to a child