मोसम नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मोसम नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन प्रश्न पुन्हा ऐरणीवर

अंबासन (नाशिक) - मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात मोसम नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरात लीलाव झालेला नसतानाही आर्थिक देवाणघेवाणीतून सर्रास अनाधिकृतरित्या वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत स्थानिक काही शेतक-यांनी हटकले असता त्यावरही वाळू माफियांनी दबावतंत्र टाकल्याचे बोलले जाते. बिनदिक्कत सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

अवैधरित्या वाळू उपशामुळे नदी काठावरील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. तरीही मुजोर वाळू माफियांकडून वाळू उपसा सुरूच असल्याचे चित्र आहे. गावागावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. दरम्यान जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून चाळीत साठवून ठेवलेला कांदा गुरांना शेतकरी पुरवत आहेत तर अनेक गावांना शासनाच्या टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र याचे वाळू माफियांना काहीही घेणेदेणं नसल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वीच खाकुर्डी (मालेगाव) ग्रामस्थांनी ग्रामसभेत मोसम नदीपात्रातील अवैध वाळू उपसा विरोधात ठराव पारित करुन वडणेर खाकुर्डी येथील पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना निवेदन दिले. वळवाडे शिवारात सर्रासपणे अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याने काही शेतक-यांनी संबंधित वाळू माफियांना हटकले होते. परंतू निर्भय झालेल्या माफियांनी शेतक-यांना दबावतंत्राचा वापर करून गप्प बसविल्याची चर्चा आहे. अवैधरित्या वाळू वाहतुकीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून रात्रीचे बेडरपणे रस्त्यावर जा-ये करणा-या टॅक्टरच्या कर्कश आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. या अवैधरित्या वाळू वाहतुकीला कोणाचाही धाक उरला नसल्याने एखाद्या वाहनावर कार्यवाही केली की दोन दिवसात पुन्हा 'जैसे थे' वाहतुक सुरू होते. संबधित विभागांचे अधिकारी केव्हा कुठे जातात खबरी माफियांना माहिती पुरवत असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एकाने सांगितले. ज्या ठिकाणी वाळू उत्खनन केले जात आहे तेथील काही अंतरावर कोठरे खुर्द व बुद्रुकला पाणीपुरवठा करण्यात येणारी विहिर आहे. गावाला पाणीपुरवठा करणा-या विहिरीचेही वाळू उत्खननमुळे तळ गाठल्याचे ग्रामस्थांनी 'दैनिक सकाळ'शी बोलताना सांगितले. 

अजून किती बळी
३ सप्टेंबर २०१८ रोजी संवदगाव (ता.मालेगाव) येथे अवैधरित्या वाळू उपसा करतांना खदान कोसळल्याने भावडू वाघ या मजुराचा मृत्यू झाला, निंबोळा शिवरस्त्यावर अनाधिकृत वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने घेऊन जातांना सुनिल सोनवणे हा जागीच ठार झाला तर अनिल नवरे या मजुराचा उपचारादम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाही याचा बोध संबंधित विभागाने घेतला नसावा का? वाळू तस्करीचे प्रमाण कमी का होत नाही. याबाबत ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.     

प्रत्येक ठिकाणी रात्रंदिवस भरारी पथक फिरत आहे. 
- ज्योती देवरे, तहसीलदार मालेगाव.

महसूल विभागाशी संबंधित असल्याने दोन्ही विभागात वाद निर्माण होऊ नये यासाठी शांत आहे. महसूल विभागाने आदेश दिल्यास कठोर कारवाई केली जाईल.
- रामेश्वर मोताळे, पोलिस निरीक्षक वडणेर खाकुर्डी.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com