तहसीलदारांवर दगडफेक करून वाळू माफियांनी पळवले ट्रॅक्टर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

तहसीलदार व पथकाने आपला पाठलाग करू नये, म्हणून या वाळूमाफियांनी तहसीलदार व तलाठ्यावर दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी पलायन केले. या प्रकारासंदर्भात तहसीलदार बी. ए. कापसे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी वाळूमाफियांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पाचोरा : येथील तहसीलदार बी. ए. कापसे यांचे सोबत असलेल्या 4 तलाठयांवर वाळू माफियांनी गिरणा नदीपात्रात दगडफेक करून जप्तीसाठी आणले जाणारे ट्रॅक्टर पळवून लावले. उत्राण जवळच्या गिरणा नदीपात्रात ही घडली असून, अज्ञात वाळू माफियांविरुद्ध पाचोरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत तहसीलदार कापसे यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या तक्रारीचा आशय असा, की उत्राण जवळच्या गिरणा नदीपात्रात पाचोरा हद्दीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाळू चोरी होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला खबऱ्यांकडून प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे तहसीलदार कापसे यांनी आपले सहकारी तलाठी सोबत घेऊन उत्राण जवळच्या गिरणा नदीपात्रात जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरणा नदीपात्रात एक वाळूने भरलेला ट्रॅक्टर व एक रिकामा ट्रॅक्टर या पथकाला आढळून आला. तहसीलदार कापसे यांनी वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरवर दोन तलाठी बसवून ते पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुमारे पंचवीस जणांचा जमाव जमला व त्यांनी एकेरी व शिवराळ भाषेत तहसीलदार कापसे व  त्यांच्यासोबत असलेल्या तलाठ्यांना शिवीगाळ करत अरेरावीने दमदाटी करत ट्रॅक्टर वर बसलेले दोन्ही तलाठी खाली ओढत जमा करण्यासाठी आणले जाणारे ट्रॅक्टर पळवून नेले.

तहसीलदार व पथकाने आपला पाठलाग करू नये, म्हणून या वाळूमाफियांनी तहसीलदार व तलाठ्यावर दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी पलायन केले. या प्रकारासंदर्भात तहसीलदार बी. ए. कापसे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी वाळूमाफियांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पाचोरा येथे गजबजलेल्या वस्तीत प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री वाळूमाफियांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. या घटनेची चर्चा थांबत नाही तोच उत्राण जवळ पाचोरा हद्दीतील गिरणा नदीपात्रात तहसीलदारांसह त्यांच्या पथकावर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. उत्राण जवळच्या गिरणा नदीपात्रात ही तुमची नाही तुम्ही कारवाई कोणत्या आधारे करत आहे, असा जाब विचारत एकेरी व शिवराळ भाषेत अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत महसूल पथकावर वाळू माफियांनी केलेली दगडफेक प्रशासनाची झोप उडवणारी ठरली आहे. प्राप्त फिर्यादीच्या आधारे पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.

Web Title: sand mafia attack tahsildar