सेंद्रिय पुदिनायुक्त ताकाची ग्राहकांना भूरळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

आश्वी - परंपरागत शेती व्यवसाय परवडत नाही म्हणून, चरितार्थासाठी राजहंस दुध संघाचे दुध व उपपदार्थ विक्रीचा छोटासा व्यवसाय सुरु केलेल्या युवा शेतकऱ्याने, केवळ ताक न विकता त्यात पुदिन्याच्या रसाचे मिश्रण केल्याने, त्याच्या मठ्ठ्याचा आस्वाद घेणारा मोठा ग्राहकवर्ग तयार झाला आहे. विजय गुंजाळ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

आश्वी - परंपरागत शेती व्यवसाय परवडत नाही म्हणून, चरितार्थासाठी राजहंस दुध संघाचे दुध व उपपदार्थ विक्रीचा छोटासा व्यवसाय सुरु केलेल्या युवा शेतकऱ्याने, केवळ ताक न विकता त्यात पुदिन्याच्या रसाचे मिश्रण केल्याने, त्याच्या मठ्ठ्याचा आस्वाद घेणारा मोठा ग्राहकवर्ग तयार झाला आहे. विजय गुंजाळ असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 

संगमनेर शहरालगतच्या पंचायत समिती कार्यालयाजवळ कोल्हार घोटी राज्यमार्गाच्या कडेला राजहंसचा टपरीवजा स्टॉल या मार्गावरील अनेक प्रवाशांचा अघोषित थांबा ठरला असून, या ठिकाणी अवघ्या दहा रुपयात मिळणारा रुचकर, आयुर्वेदिक गुणधर्माचा पुदिनायुक्त मठ्ठा ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. या परिसरातच विजय गुंजाळ यांची वडिलोपार्जीत अवघी एक एकर जमीन आहे. त्या पारंपारिक पिके घेत असत. मात्र शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार झाल्याने, कुटूंबाच्या चरितार्थासाठी विजय यांनी २०१२मध्ये राजहंस दुध संघाचे दुग्धजन्य पदार्थ किरकोळ विक्रीचा छोटा व्यवसाय सुरु केला. दुध, ताक, दही व इतर पदार्थ किरकोळ विकताना प्रयोगशील स्वभावाच्या विजय गुंजाळ यांनी पुदिना या वनस्पतीचा ताजा रस, विशिष्ट मसाला मिसळलेले ताक विक्रीला ठेवले. थोड्याच दिवसात हे नवीन चवीचे, पाचक, आयुर्वेदिक गुणधर्माचे पेय ग्राहकांच्या पसंलीला उतरले. कर्णोपकर्णी पसरलेल्या मठ्ठ्याच्या किर्तीमुळे या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी आवर्जून येथे थांबू लागले. ग्राहकांची पसंती लक्षात घेवून विजय गुंजाळ यांनी त्यात अधिक प्रयोग करुन स्वतःचा फॉर्म्युला तयार केला.

या मठ्ठ्याला जवळपास वर्षभर ग्राहक मिळत असल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जाचा पुदिना हवा म्हणून, त्यांनी घरच्या शेतात दोन गुंठ्यात आंतरपिक म्हणून पुदिना लावला, ग्राहकांचे हित लक्षात घेवून, त्यासाठी केवळ सेंद्रिय खताचा वापर ते करतात. यासाठी जवळपास दररोज २५ किलो पुदिना वापरण्यात येतो. त्यांची पत्नी व आई पुदिना कापणे, स्वच्छ करणे, त्याचा रस तयार करणे ही कामे करतात. दररोज सुमारे ७०० ग्लास ताकांची विक्री होते. मात्र सुरवातीपासून त्याची विशिष्ट चव व १० रुपये किंमत त्यांनी कायम राखली आहे. या बरोबरच इतर दुग्धजन्य उपपदार्थांच्या विक्रीतून खर्च वजा जाता त्यांना सरासरी तीन हजार रुपये रोज मिळतात.

आपल्या शेतातील उत्पादनाचा दैनंदिन व्यवसायात चपखल वापर करुन, विजय गुंजाळ यांनी स्वतःचा ब्रँड तयार करण्यात यश मिळवले असून, ग्राहकांच्या आरोग्यासाठी, पचनासाठी हितकर असलेल्या त्यांच्या मठ्ठ्याने ग्राहकांच्या मनात स्थान मिळवले आहे.

Web Title: sangamner farmers butter milk popular