मध्यरात्री अतिक्रमणे हटवत मुख्याधिकारी नांदूरकरांची 'दबंग' कारवाई

मध्यरात्री अतिक्रमणे हटवत मुख्याधिकारी नांदूरकरांची 'दबंग' कारवाई

येवला : रात्री दहा वाजेच्या सुमारास मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानी जमलेले ५० वर पालिका कर्मचारी अन तासाभराने वर्दळीच्या विंचूर चौफुलीवर अचानकपणे सुरू झालेली अतिक्रमण हटाव मोहीम...सर्व काही अनपेक्षित... पण पालिकेच्या १५० वर्षाच्या काळात प्रथमच मध्यरात्री प्रथमच अशी कारवाई होत होती.अन या मोहिमेची सूत्रधार होती लेडी 'सिंघम' मुख्याधिकारी संगीता नांदूरकर! अतिशय गोपनीयरित्या तब्बल पाच तासांवर राबवलेल्या या मोहीमेत २५० वर अतिक्रमणे हटवली गेली.

वाहतूक, पार्किंग, दुकाने, हातगाड्या कुठेही लावून शिस्तीचा पुरता बोजवारा उडालेले चित्र शहरात आहे. मध्यंतरी पोलीस व पालिकेने या प्रकाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला पण तो तेव्हाच असफल झाला होता. मात्र येथे रुजू होऊन जेमतेम दोन-तीन आठवडे झाले नाही तोच पालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी यावर लक्ष केंद्रित केले आहे.

सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांनी पालिकेत सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना करत दहा वाजेच्या सुमारास निवासस्थानी येण्यास सांगितले. तोपर्यत मोहिमेची कुठलीही कल्पना कर्मचाऱ्यांना दिली नव्हती. याठिकाणी सर्वांचे मोबाईल जमा करून घेतल्यावर त्यांनी या मोहिमेची माहिती देत लागलीच तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.

सोमवारी मध्यरात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक शहरात अतिक्रमण विरोधी धडक मोहीम सुरु झाली. कुठलीही प्रसिद्धि नाही कि गवगवा नाही...विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त न घेता मध्यरात्री नांदुरकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भलामोठा फौजफाटा घेवून सुरुवात केली.

पालिकेचे ट्रॅक्टर व साहित्यावरच गरज भागवत तब्बल पाच तास म्हणके पहाटे साडेचार वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. शहरातील शनिपटांगण, बाजारतळ परिसर, कोंबडी बाजार, सप्तशृंगी माता मंदिर परिसर, येवला-मनमाड रोड, येवला-कोपरगाव रोड व येवला वैजापूर रोडवरील अतिक्रमणे तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तसेच इतरही अनधिकृत, अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत चहाच्या व पानटपऱ्या, फळांचे स्टोल, कोंबडी चिकन विक्रीचे अतिक्रमित दुकाने, रसवंती,
हातगाडया अशी जवळपास अडीचशे अतिक्रमणे हटविण्यात आली.

मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्या उपस्थितीत पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख अभिजित इनामदार,मुख्य लिपिक बापूसाहेब मांडवडकर,जागाभाडे निरीक्षक अशोक कोकाटे,स्वच्छता निरीक्षक घनशाम उंबरे व सुनील संसारे यांच्यासह स्वच्छता व रोजंदारी विभागाचे प्रत्येकी १५ कर्मचारी,विदयुत व पाणीपुरवठा,कर विभागाचे १२  कर्मचारी,अतिक्रमण विरोधी विभागाचे अधिकारी व कर्मचारी असा जवळपास ५५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा सहभागी झाला होता.

पप्पा कुठे गेले...!
या मोहिमेची गुप्तता मुख्याधिकारी नांदूरकर यांनी इतकी राखली की कर्मचार्यांच्या घरीदेखील याची माहिती नव्हती. एक कर्मचारी पहाटेपर्यत मोहीम चालल्याने घरी गेलेच नाही. त्यामुळे सकाळी सकाळी त्यांचा मुलगा एका सहकारी कर्मचाऱ्याकडे जाऊन पप्पा कुठे गेले...! याची विचारपूस करत होता.

अतिक्रमणे वाहतूक कोंडीचे निमित्त....
राज्य महामार्गांवर दुकाने,हातगाड्या यांची संख्या प्रचंड  वाढली असून यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी नित्याची झाली आहे.अशीच अवस्था शनिपटांगण भागातील देखील आहे.शिस्त नसल्याने कोणीही कोठेही दुकान थाटते. आता अतिक्रमण काढण्यात आल्याने या मार्गानी मोकळा श्वास आज घेतला असला तरी पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता नागरिकांसह पालिकेला घ्यावी लागणार आहे.

वारंवार सूचना देवूनही संबंधितांनी आपापले अतिक्रमण न काढल्याने पालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली.या मोहिमेत शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या,रस्त्याच्यावर आलेले अतिक्रमण,हातगाड्या,अनेक स्टोल्स आदी जवळपास अडीचशे अतिक्रमणे हटविण्यात आली.अशा प्रकारची मोहीम पालिकेच्या वतीने सातत्याने राबविण्यात येणार असून यासाठी अतिक्रमण विरोधी पथकाची देखील निर्मिती करण्यात आली आहे.
-    संगीता नांदुरकर, मुख्याधिकारी- येवला नगरपालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com