तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर..! - संतोष पाटील

तेव्हाच गांभीर्याने घेतले असते तर..! - संतोष पाटील

जळगाव - गोळीबारात जखमी माजी नगरसेवक संतोष (आप्पा) पाटील यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली असून, आज त्यांनी संशयितांच्या अटकेची मागणी केली आहे. दोन महिन्यांपासून आपण तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांची भेट घेऊन पूर्वनियोजित हल्ल्याची शक्‍यता व्यक्त करून लेखी निवेदनही दिले होते. पोलिसांनी तेव्हाच गांभीर्याने घेत चौकशी केली असती, तर कदाचित हल्ला झाला नसता, असेही माध्यमांशी बोलताना संतोष पाटील म्हणाले.

शाहूनगरातील ‘सहयोग क्रिटिकल’मध्ये दाखल असलेले माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर उपचार सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्यांनी घटना घडल्यापासूनची वृत्तपत्रेही वाचून काढली. पोलिसांनी अटक केलेला संशयित अरबाज पिंजारी याचा आपला दुरान्वये संबंध नाही. त्याचा साथीदार जिगर बोंडारे या दोघांना कधीच बघितले नाही. घटनेच्या दिवशी ईश्‍वर तायडे हा वाघनगरपासून ते जिजाऊनगरपर्यंत माझ्या दुचाकीच्या मागे येत होता. त्याने मागून कोणाला तरी तेव्हा इशारा केला. मात्र, मी दुर्लक्ष करून पुढे निघून गेलो. नंतर, शेताजवळ आलो असताना मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळीबार केला, त्या दिवशी माझ्याकडे रिव्हॉल्व्हर नसती, तर कदाचित त्यांनी मारून टाकले असते, असेही पाटील म्हणाले. गोळीबार करणारे हल्लेखोर बारीक पोरांप्रमाणे दिसत होते, रिव्हॉल्व्हर रोखल्यावर दोघेही गडबडून गेले. नंतर पळत सुटले. त्यांची माझी ओळख असती, तर मी रिव्हॉल्व्हर बाळगतो, याची माहितीही असती. या सर्व बाबींवरून हा सर्व ‘हटकर गॅंग’ने रचलेला कट असल्याची खात्री झाली आहे.

...अन्यथा उपोषण
‘हटकर गॅंग’ला लवकरात लवकर अटक करावी, अशी आपली मागणी असून, त्यांना अटक न झाल्यास आम्ही कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसू, असेही संतोष पाटील यांनी सांगितले.

अरमान पिंजारीची कोठडीत रवानगी
माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी संशयित अरबाज दाऊद पिंजारी याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.

जखमीच्या तक्रारीवरून कटकारस्थान रचून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात बुधा दला हटकर, कैलास बुधा हटकर, आनंदा बुधा हटकर, लखन नारायण हटकर, राहुल सुरेश हटकर, ईश्‍वर तायडे यांच्यासह प्रत्यक्ष हल्ला करणारे भूषण ऊर्फ जिगर रमेश बोंडारे (रा. उमाळा) आणि अरबाज दाऊद पिंजारी (वय २२, हरिविठ्ठलनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित अरबाज स्वत: पोलिसांना शरण आला असून, त्याची चौकशी करून पोलिसांनी आज जिल्हा न्यायालयात हजर केले. न्या. डी. बी साठे यांच्या न्यायालयाने ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. सरकारपक्षातर्फे ॲड. किशोर तडवी यांनी कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com