पाच लाखांत घेतली संतोष पाटलांची 'सुपारी'

Murder
Murder

जळगाव - माजी नगरसेवक संतोष (आप्पा) पाटील यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या अरमान पिंजारी व जिगर बोंडारे यांच्यासह आता जिगरचा साथीदार समीर शेख सलीमलाही पोलिसांनी अटक केली. या एकूणच प्रकरणात आता संतोष पाटील यांची पाच लाखांत ‘सुपारी’ दिल्याची माहिती समोर येत आहे, तर ‘दुचाकी मी चालवत होतो व मागे बसलेल्या अरबाजनेच गोळी झाडली’, अशी कबुली समीरने पोलिस चौकशीत दिली आहे. 

भाजपच्या विद्यमान नगरसेविकेचे पती माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर ३१ डिसेंबरला सकाळी दहाच्या सुमारास गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दाखल गोळीबार प्रकरणाचा तपास डीवायएसपी डॉ. नीलाभ रोहन करीत आहेत. गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक महेश जानकर, रवींद्र पाटील, मनोहर देशमुख यांच्यासह पथकाने आज समीर शेख सलीम (वय १८, रा. पिंप्राळा-हुडको) यास अटक केली. 

समीर शेखकडून गुन्ह्याची कबुली
समीरने दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या आठ दिवसांपूर्वी ईश्‍वर तायडे, कैलास हटकर या दोघांनी अरबाज आणि समीर या दोघांना काम सोपवले. अजिंठा चौफुलीवरील एका हॉटेलमध्ये ठरल्यानुसार अरबाज पिंजारी, फारुख पटेल आणि समीर शेख सलीम अशा तिघांनी संतोष आप्पाच्या खुनाचा विडा उचलत आगेकूच केली. कंजरवाडा येथून अरबाजला उचलल्यावर अरबाजने ममुराबाद येथून हिरोहोंडा मोटारसायकल चोरली. संतोष पाटील याच्या मागावर लोखंडी पुलाजवळ गेली आठ दिवस पाळत ठेवून व्यूहरचना करण्यात आली. 

असा केला हल्ला
३१ डिसेंबरला सकाळी संतोष पाटील यांचा पाठलाग करीत समीर व अरबाज या दोघांनी आर्यन पार्कच्या कंपाऊंडजवळ त्यांना गाठले. समीर चालवत असलेल्या दुचाकीवर मागे बसलेल्या अरबाजने संतोषअप्पावर गोळी झाडली. नंतर खाली पडल्यावर संतोषअप्पाने रिव्हॉल्वर काढून दोघांच्या दिशेने रोखल्यावर आम्ही पळत सुटल्याची माहिती अटकेतील समीर याने पोलिसांना दिली आहे. 

जिगरचे उपोषण संपुष्टात 
गोळीबार प्रकरणात जिगर ऊर्फ भूषण बोंडारे याला गुन्हेशाखेने २ जानेवारीला नाशिक येथून अटक केली होती. घटनेच्या आधीपासून आपण नाशकात असून, गोळीबार प्रकरणात आपण नसल्याचे तो वारंवार सांगत असताना त्याला गुन्ह्यात अटक केल्याने तीन दिवसांपासून त्याने जेवण सोडून आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला होता. समीरच्या अटकेनंतर पोलिस पथकाने त्याला शाश्‍वती दिल्याने कालपासून त्याने जेवणास सुरवात केल्याची माहिती समोर आली.

..अशी झाली ‘डील’
अटकेतील संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास हटकर व ईश्‍वर तायडे यांनी जिगर बोंडारे याच्याशी संतोष अप्पाच्या खुनाची सुपारी देत पाच लाखांत ‘डील’ केली होती. त्यानुसार जिगर बोंडारे, अरबाज पिंजारी, समीर शेख, फिरोज पटेल, तुषार दत्तात्रेय सोनार, शुभम मनोज देशमुख ऊर्फ दाऊद अशा पाचही संशयितांनी दसरा-दिवाळीदरम्यान चोपडा येथून रिव्हॉल्व्हर खरेदी करून संतोष अप्पांचा ‘गेम’ करण्यासाठी जळगावात येत असताना कारचा अपघात झाला. अपघातानंतर सर्व पळून गेले. मात्र, गाडीत रिव्हॉल्व्हर आणि रोकड सापडल्याने चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात आपण स्वतः घडवून आणला होता. कारण संतोषअप्पा मोठा माणूस असल्याने त्याला मारून झेंगट ओढवून घेण्याऐवजी कैलास व ईश्‍वरकडून मिळेल तसे पैसे उकळून आपण खर्चपाणी भागवत होतो. साठ हजार रुपये त्यांनी आपल्यावर खर्च केल्याच्या या जिगरने दिलेल्या माहितीचा पोलिस तपासात उलगडा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com