सोनगीरला तापीचे पाणी मिळालेच पाहिजे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

सोनगीर - येथील पाणीटंचाईची प्रशासन दखल घेत नसल्याने व ग्रामस्थांचे पाण्यावाचून होणारे हाल पाहून "तनिष्कां'नी एल्गार पुकारत आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सोनगीरला तापी नदीतून पाणी मिळालेच पाहिजे, पाणी प्रश्न सुटलाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना दिला. 

सोनगीर - येथील पाणीटंचाईची प्रशासन दखल घेत नसल्याने व ग्रामस्थांचे पाण्यावाचून होणारे हाल पाहून "तनिष्कां'नी एल्गार पुकारत आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सोनगीरला तापी नदीतून पाणी मिळालेच पाहिजे, पाणी प्रश्न सुटलाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांना दिला. 

येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करीत असली, तरी प्रशासन मात्र त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वरिष्ठ राजकीय नेते, उच्च अधिकारीही दुर्लक्ष करीत आहेत. स्थानिक नेते, ग्रामपंचायत सदस्य, विविध पक्षांचे कार्यकर्ते यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह आपापल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाणीटंचाईबाबत निवेदन दिले. मात्र, कोणीच दखल घेतली नाही. या पार्श्‍वभूमीवर पाणीटंचाई दूर करण्यासाठी तनिष्का पुढे सरसावल्या आहेत. सोनगीर व धुळ्यातील तनिष्कांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. पाणीटंचाई सोनगीरची असली तरी सर्व तनिष्का सदस्यांनी आंदोलनात सहभागी होत प्रशासनाला इशारा दिला. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना हा प्रश्‍न समजावून सांगत तातडीने उपाययोजना करण्यासाठी सहयोग करण्याची विनंती तनिष्कांनी केली. येथील तनिष्का गटप्रमुख तथा पंचायत समिती सदस्या रूपाली रविराज माळी यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. 

ग्रामपंचायत कोणतीही उपाययोजना करीत नसून केवळ पाणीवाटपात कपात करीत आहे. आठ दिवसांत मिळणारे पाणी लवकरच दहा दिवसांआड होणार आहे. म्हणून ग्रामस्थांत असंतोष निर्माण झाला आहे. धुळ्याला होणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेला अनेक ठिकाणी गळती असून, लाखो लिटर पाणी वाया जाते. ते वाचवावे व सोनगीरला चार इंची व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी द्यावे किंवा स्वतंत्र योजना व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले. तनिष्कांनी पाणीप्रश्‍नाची कशी वाताहत झाली आहे, हे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. गेले चार महिने नुसतीच चर्चा सुरू आहे. आता स्रोतही आटले आहेत, त्यामुळे तापीचे पाणी एवढाच सध्या तरी दिलासा असल्याचे तनिष्कांनी सांगत प्रश्‍न मार्गी लावण्याचे आवाहन केले. 

तनिष्का सदस्या डॉ. सीमा सोनवणे शकुंतला चौधरी, प्रतिभा लोहार, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा भोई, छाया चंद्रशेखर कासार, विमलबाई पावनकर, ज्योती विष्णू चौधरी, छाया राजेंद्र कासार तसेच धुळ्यातील तनिष्का रत्ना पाटील, मीनल पाटील, दीपा वानखेडे, संगीता पाटील, नीता खत्री, अर्चना पाटील, शोभा ठाकरे, सुजाता आडे आदी उपस्थित होते. 

सोनगीरच्या पाणीप्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी लवकरच महापालिका आयुक्तांशी चर्चा करून तापी वाहिनीचे पाणी मिळवून देत टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
-दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी 

Web Title: saongir water issue