सुट्यांमुळे दोन लाख भाविक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

वणी - दिवाळी संपताच आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांचा योग साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व कावडयात्रेप्रमाणेच गडाला दिवाळी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांत सुमारे दोन लाखांवर भाविक आदिमायेचरणी लीन झाले.

वणी - दिवाळी संपताच आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी दिवाळीच्या सुट्यांचा योग साधत गडावर भाविकांची गर्दी उसळली असून चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव व कावडयात्रेप्रमाणेच गडाला दिवाळी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवार व रविवार या दोन दिवसांत सुमारे दोन लाखांवर भाविक आदिमायेचरणी लीन झाले.

खानदेश, गुजरातमधील भाविकांबरोबरच गुजरात व महाराष्ट्रातील भाविक व पर्यटक दिवाळी संपताच सुटीचा योग साधत देवदर्शन व पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. यात बहुतांश भाविक सप्तशृंगगड, शिर्डी, पंचवटी, त्र्यंबकेश्‍वर या तीर्थक्षेत्रांबरोबरच सापुतारा या पर्यटनस्थळी भेटीचे नियोजन करून घराबाहेर पडतात. शुक्रवारी भाऊबीजेनंतरचा शनिवार व रविवार सुटीचा योग साधत लाखो भाविक खासगी वाहनांनी गडावर आल्याने नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटरच्या घाटरस्त्यात वाहनांची रांग लागली होती. वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने गडावर वाहनांना पोचण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागत होता. मंदिर ते पहिल्या पायरीपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. फ्युनिक्‍युलर रोपवेद्वारे मंदिरात जाण्यासाठीही भाविकांची गर्दी झाल्याने तिकिटासाठी तसेच रोप वे ट्रॉलीत जागा मिळण्यासाठीही रांगा लागल्या होत्या. त्यातूनही भाविकांना सुमारे एक तासाचा कालावधी लागत होता. भाविकांची एकच गर्दी उसळल्याने सप्तशृंगगडावर ‘अंबे माते की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषाने सप्तशृंगगड दुमदुमून गेला होता. न्यासाच्या प्रसादालयात दोन दिवसांत सुमारे चाळीस हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  

बसफेऱ्या वाढविण्याची मागणी 
दरम्यान, दिवाळीच्या सुटीनिमित्त गडावर होणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन गडावर खासगी वाहनांसाठी वाहनतळ तसेच नवरात्र व चैत्रोत्सवाप्रमाणेच पोलिस बंदोबस्त, आरोग्य व्यवस्था, राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याची मागणी भाविक करीत आहेत. तसेच देवीमंदिर रात्री साडेआठच्या दरम्यान बंद होत असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने मंदिर रात्री बारापर्यंत उघडे ठेवण्याची मागणी भाविकांनी केली आहे.

खासगी वाहतूकदारांची दिवाळी
गडावरील भाविकांची संख्या लक्षात घेत राज्य परिवहन महामंडळाने बसचे नियोजन न केल्यामुळे गर्दीचा फायदा घेत खासगी वाहनधारकांची चांगलीच दिवाळी होत आहे. गर्दीवर नियंत्रण व सुरक्षिततेच्या दृष्टीने न्यासाचे सुरक्षा कर्मचारी न्यासाच्या कार्यक्षेत्रात तैनात असले तरी इतर ठिकाणी पोलिस यंत्रणा पुरेशा प्रमाणात कार्यरत नसल्याने भाविकांची सुरक्षाही भगवतीच्या हातीच असल्याचे चित्र आहे.  चैत्रोत्सव, नवरात्रोत्सवात गडावर खासगी वाहनांना बंदी असते. त्यामुळे गडावर वाहनांची कोंडी होत नाही. परंतु इतर वेळी वाहने थेट नेण्याची परवानगी असल्यामुळे गडावर खासगी वाहानांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. 

Web Title: Saptashrungi Bhavik Holiday