आदिमाया सप्तशृंगीचा चैत्रोत्सव 4 एप्रिलपासून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

मालेगाव - आदिमाया सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव 4 एप्रिलपासून सुरू होणार आहे. उत्सवासाठी सप्तशृंगगडावर तयारी सुरू झाली. या वेळी झालेला समाधानकारक पाऊस, बहरलेला रब्बी हंगाम, दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे उत्सवाला मोठी गर्दी होईल. गडाला पाणीपुरवठा करणारा भवानी पाझर तलाव तळ गाठत असून, या वर्षीही भाविकांची तहान टॅंकरनेच भागवावी लागणार आहे. 

मालेगाव - आदिमाया सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव 4 एप्रिलपासून सुरू होणार आहे. उत्सवासाठी सप्तशृंगगडावर तयारी सुरू झाली. या वेळी झालेला समाधानकारक पाऊस, बहरलेला रब्बी हंगाम, दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे उत्सवाला मोठी गर्दी होईल. गडाला पाणीपुरवठा करणारा भवानी पाझर तलाव तळ गाठत असून, या वर्षीही भाविकांची तहान टॅंकरनेच भागवावी लागणार आहे. 

भगवतीचा चैत्रोत्सव एप्रिलच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात येत आहे. 4 एप्रिलला श्रीरामनवमीला भगवतीची महापूजा होऊन उत्सवाला प्रारंभ होईल. 13 एप्रिलपर्यंत उत्सव सुरू राहील. उत्सवकाळात रोज सकाळी सातला भगवतीची पंचामृत महापूजा होईल. 9 एप्रिलला मध्यरात्री भगवतीच्या शिखरावर कीर्तीध्वज फडकेल. 13 एप्रिलला भगवतीची प्रक्षालय पंचामृत महापूजा व महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. चैत्रोत्सवासाठी खानदेशसह राज्यातील लाखो भाविक पायी यात्रेने गडावर जातात. सामाजिक संघटना व दानशूर व्यक्तींकडून यात्रेकरूंना रस्त्यावर विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातात. अशा संघटनांचेही नियोजन सुरू झाले आहे. सप्तशृंगीचा चैत्रोत्सव गड, नांदुरी आदी भागांतील आदिवासी बांधवांसाठी पर्वणी असतो. विविध खाद्यपदार्थांबरोबरच औषधी वनस्पती विक्रीची दुकाने थाटली जातात. उत्सवासाठी विविध विभागांची आढावा बैठक 24 मार्चला होणार आहे. बैठकीत यात्रोत्सवाचे नियोजन व जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या जाणार आहेत. 

या वर्षीही पाणीटंचाईचे संकट कायम 
गेल्या वर्षी गडासह जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. भवानी पाझर तलावाच्या गळतीमुळे या वर्षीही पाणीटंचाईचे संकट उभे आहे. उत्सवासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही. उत्सवानंतरही दोन महिने गडावर पाणीप्रश्‍न भेडसावणार आहे. लाखो भाविकांची तहान टॅंकरवर भागवावी लागणार आहे. दहा वर्षांपासून चैत्रोत्सव पार पाडण्यासाठी टॅंकरची मदत घ्यावी लागत आहे. कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सर्वच यंत्रणांना अपयश आले आहे. ट्रस्टचे दोन टॅंकर आहेत. ग्रामपंचायतीने दहा टॅंकरची मागणी केली आहे. आढावा बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे. 

सप्तशृंगगडावर चणकापूर धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे. भवानी पाझर तलावात पुरेसे पाणी शिल्लक नसल्याने उत्सवासाठी शासनाने दहा टॅंकर मंजूर करावेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नामुळे सप्तशृंगगड तीर्थक्षेत्राला "ब' वर्ग दर्जाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, मंजूर झाल्यानंतर पाणीप्रश्‍नासह अन्य कामांना चालना मिळेल. 
- राजेश गवळी, ग्रामपंचायत सदस्य, सप्तशृंगगड 

Web Title: saptashrungi devi chaitrostav