अवैध वाळूने घेतला सरपंच, उपसरपंचाचा बळी

Agitation
Agitation

साक्री - दातर्तीच्या सरपंच, उपसरपंचांचा अपघाती मृत्यू  नसून, तो घातपात आहे. अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाला माहिती असूनही कारवाई केली जात नाही, असा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या करणाऱ्या व्यावसायिकांचा उच्छाद वाढला आहे. दातर्ती (ता. साक्री) येथील सरपंच सदाशिव बागूल आणि उपसरपंच गणेश सूर्यवंशी यांच्या दुचाकीला वाळू वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहनाने काल (ता. २६) रात्री धडक दिली. त्यात दोघे पदाधिकारी ठार तर भास्कर बापू मानकर (४३) गंभीर जखमी झाले. गंगापूर येथील हळदीचा कार्यक्रम आटोपून गावातील  सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परत येताना हा अपघात झाला.

गावावर शोककळा
गावातील दोघे युवा पदाधिकारी अपघातात ठार झाल्याने दातर्ती गावात शोककळा पसरली. हा घातपात तर नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात आली आहे. दातर्ती शिवारातील पांझरा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे वाहतूक दारांनी नदीकाठावर वाळूचा उपसा करून ठिय्या मांडला आहे. याठिकाणाहून ही वाळू इतरत्र घेऊन जातात, रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी करून सदर चोरटी वाहतूक करतात. 

ग्रामस्थांनी केला रास्ता रोको
शनिवारी रात्री अपघात झाला. त्यात गावातील दोघा तरुण पदाधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे दातर्ती ग्रामस्थांसह साक्री शहरातील नागरिक आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी साक्री ग्रामीण रुग्णालयात गर्दी करत प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष प्रकट केला. सोबतच चोरटी वाळू वाहतूक थांबावी यासाठी वेळोवेळी केलेल्या मागण्यांची आठवण पोलिस प्रशासनाला करून दिली. महसूल प्रशासनातील अधिकारी जोपर्यंत आंदोलनस्थळी येऊन संबंधित गुन्हेगारांना पकडून कडक कारवाई करीत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली.

पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर बसत रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरवात केली. सुमारे तीन तासापेक्षा अधिक काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

प्रशासन ज्ञानी
नेमकी ही चोरटी वाळू वाहतूक कोण करतात हे प्रशासनाला माहीत आहे. तरी देखील प्रशासनातर्फे कुठलीही कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. जोपर्यंत तहसीलदार संदीप भोसले तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने तणाव वाढत गेला. परिणामी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मात्र या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. 

शिवसेना तालुकाप्रमुख विशाल देसले, विधानसभा संघटक पंकज मराठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास बिरारीस, हर्षवर्धन दहिते, पंचायत समिती सदस्य उत्पल नांद्रे, मुन्ना देवरे, महेश अहिरराव, साक्रीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र टाटिया, भाजप तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, नगरसेवक सुमीत नागरे, युवराज मराठे, धमनारचे सरपंच दिनेश सोनवणे, भाजप शहराध्यक्ष महेंद्र देसले, शेवाळीचे दीपक साळुंके, जयेश सोनवणे, दिगंबर पवार, नितीन साळुंके आदि उपस्थित होते. 

आंदोलनकर्त्यांना प्रकरण संयमाने हाताळण्याची सूचना करीत साक्रीचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे आणि सहकाऱ्यांनी प्रयत्न केला. पिंपळनेर आणि निजामपूर येथील अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.

ग्रामस्थांचा आरोप
सरपंच आणि उपसरपंचांच्या मृत्यूस चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर चालक जबाबदार आहेत. याविषयीची माहिती प्रशासनाला देखील आहे, मात्र तरीही प्रशासन मूग गिळून गप्प बसल्याचा गंभीर आरोप यावेळी दातर्ती येथील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तरुणांसह ग्रामस्थांनी केला.

प्रशासनाने दिले लेखी आश्वासन...
आंदोलकांच्या रस्ता रोकोची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. तहसीलदार संदीप भोसले यांनी आंदोलनस्थळी जात त्यांना कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यात म्हटले आहे, की दातर्ती आणि परिसरात यापुढे कुठल्याही प्रकारचे अवैधरीत्या वाळू उत्खनन आणि चोरटी वाळू वाहतूक होऊ नये याकरिता २४ तास पथक नेमण्यात येईल. वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल. अपघात प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्यात येत आहे. संबंधितांवर गरज असल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com