ढोलताश्याच्या गजरात पालिकेची कर वसूली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

सटाणा - पालिका प्रशासनाने या वर्षी कर वसुलीचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पालिकेच्या वसुली पथकाने गेल्या काही वर्षांपासून कर चुकविणाऱ्या शहरातील निवडक मालमत्ताधारकांना वठणीवर आणण्यासाठी त्यांच्या घरांसमोर जावून ढोलताशा, बेंड व भोंगा वाजवून कर वसुली सुरु केली आहे. या आगळ्यावेगळ्या गांधीगिरीमुळे थकीत मालमत्ताधारकांची बोलती बंद झाली असून, त्यांचे धाबे दणाणले आहे. या उपक्रमाचे नियमित कर भरणाऱ्या शहरवासीयांनी स्वागत केले आहे.

गेल्या वर्षी पालिका प्रशासनाने शहरातील मालमत्ताधारकांकडून पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करून तब्बल ९६ टक्के कर वसुली केली होती. पालिकेच्या इतिहासात हा एक नवा विक्रम प्रस्थापित झाला होता. या वर्षी मात्र चित्र उलटे दिसू लागल्याने पालिका प्रशासनाला उद्दिष्ट्य पूर्ण करतांना मोठी कसरत करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे व वसुलीसाठी नियुक्ती केलेल्या विशेष पथकाने धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यालाही काही थकीत मालमत्ताधारक दाद नसल्याने मुख्याधिकारी डगळे यांनी ही आगळीवेगळी क्लृप्ती शोधून करवसुली सुरु केली.

ढोल ताशे बजाव मुळे व अप्रत्यक्षपणे थकबाकीदारांना टार्गेट केले जात असल्याने वसुलीचे प्रमाण वाढले आहे. पालिकेचे वसुली निरीक्षक जितेंद्र केदारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रथम थकबाकीदार मालमत्ताधारकांची नावे असलेला डिजिटल फलक शहरातील चौकाचौकात लावला. या फलकाचे वाचन करण्यासाठी नागरीकांची गर्दी होऊ लागली. त्यानंतर फलकांवरील थकबाकीदारांची संख्या कर भरल्यामुळे कमी कमी होऊ लागली. तरी देखील काही थकीत मुजोर मालमत्ताधारकांनी कर वसुलीकडे पाठ फिरविली. त्यांना जाग आणण्यासाठी पालिका प्रशासनाने हा अभिनव उपक्रम सुरु केला. या पथकाने थकीत मालमत्ताधारकांच्या घरासमोर बँड, भोंगे तसेच ढोलताशा बडवून प्रत्यक्ष कर भरणा करीत नाही तोपर्यंत दररोज एकवेळेस घरासमोर हा वाद्य वादनाचा प्रकार सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. तरीही अशा मालमत्ताधारकांनी येत्या दोन दिवसात थेट पालिकेच्या वसुली विभागात येऊन करभरणा केला नाही तर त्यांच्या नळ जोडण्या तात्काळ बंद करून मालमत्ता देखील जप्त करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी हेमलता डगळे व वसुली निरीक्षक जितेंद्र केदारे यांनी स्पष्ट केले.

Web Title: satana mahanagar palika tax