कुटुंबाची खरी ताकद म्हणजे अकृत्रीम प्रेम : विवेक घळसासी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सटाणा : समाजाची खरी ताकद कुटुंब असून कुटुंबाची खरी ताकद म्हणजे अकृत्रीम प्रेम. निराशा, हताशा, औदासिन्यात अडकून न राहाता प्रत्येक कुटुंबाने माझा देश विश्वगुरु झाला पाहिजे, हे ठरविण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात प्रकांड पंडित, विद्या वाचस्पती, उद्बोधक आणि ज्येष्ठ विचारक विवेक घळसासी यांनी काल रविवार (ता. २६) रोजी येथे केले. 

सटाणा : समाजाची खरी ताकद कुटुंब असून कुटुंबाची खरी ताकद म्हणजे अकृत्रीम प्रेम. निराशा, हताशा, औदासिन्यात अडकून न राहाता प्रत्येक कुटुंबाने माझा देश विश्वगुरु झाला पाहिजे, हे ठरविण्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन प्रख्यात प्रकांड पंडित, विद्या वाचस्पती, उद्बोधक आणि ज्येष्ठ विचारक विवेक घळसासी यांनी काल रविवार (ता. २६) रोजी येथे केले. 

येथील सहकारमहर्षी (कै.) दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त (कै.) दादासाहेब वसंतराव दगाजी पाटील चेरीटेबल ट्रस्टतर्फे दगाजी चित्रमंदिरमध्ये आयोजित वसंत व्याख्यानमालेत 'प्रेमाच्या गावा जावे' या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना श्री. घळसासी बोलत होते. ते म्हणाले, प्रेमाचे गाव आपल्या घराघरात, अंगणात, माजघरात आहे. प्रेमाचे वाटप करताना त्याची दशा आणि दिशा योग्य असावी. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यासाठीही प्रेम आवश्यक असते. कुटुंबातील सांकृतिक वातावरण टिकवणे हि प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण सर्व नाते आपल्याला उपयोगी असेपर्यंतच आपण जपतो. सध्या कौटुंबिक प्रेमात व्यवहार आला आहे. नात्याचा आधार स्वार्थी, मतलबी नसावा. आपल्या घरासाठी प्रत्येकाने निरपेक्ष प्रेम केले पाहिजे. माणसा-माणसातील सहजभाव म्हणजेच अकृत्रिम प्रेम होय. अहंकाराच्या प्रतिष्ठेमुळे प्रेम नाहीसे होते. प्रेमामागे समर्पणाचा भाव असावा. त्याशिवाय प्रेमच होऊ शकत नाही. आजच्या तरुणाईने प्रेमाची व्याख्या त्यांच्या सोयीने केल्याने प्रेमाचा बाजार मांडला गेला आहे. सध्याच्या युगात प्रेमाला समर्पणाचा स्पर्श नाही. प्रेम केवळ आकर्षण झाले आहे. मात्र प्रेम निस्वार्थी असावे. तंत्रज्ञानाच्या दुष्टचक्रात युवा पिढी अडकत चालली आहे. तंत्रज्ञानाने माणसाच्या जीवनात अनेक प्रश्न निर्माण केले. तंत्रज्ञान या नव्या संकटापासून भावी पिढी वाचवायची जबाबदारी कुटुंबाची असून कुटुंबातील सांस्कृतिक वातावरण टिकविले पाहिजे. सगळ आहे पण प्रेम नाही हे मान्य करण्यास आपण तयार नाहीत, असेही श्री. घळसासी यांनी स्पष्ट केले. 

ट्रस्टचे संचालक डॉ. चंद्रसेन पाटील यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, वृद्धापकाळातील आई-वडिलांसह कुटुंबातील प्रत्येक घटकाचा उत्कृष्टरीत्या सांभाळ करणारे, एका मनोरुग्णाच्या निधनानंतर त्याचे पालकत्व स्वीकारत अंत्यसंस्कार करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारे तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे निरंजन रमेश बोरसे यांना सपत्नीक 'श्रावणबाळ' पुरस्कार देऊन श्री. घळसासी यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.संजय पाटील, भाजपचे उपजिल्हाध्यक्ष लक्ष्मण सावजी, बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण, द्वारकाबाई पाटील, प्रा. बी. डी. बोरसे, पांडुरंग सावळा, भगवान आहेर, ए. डी. सोनवणे, खंडेराव जाधव, अभिजित गोसावी, के. यु. सोनवणे, सुरेश येवला, एन. टी. मंजुळे, राजेश पाटील, डॉ. विजया पाटील, समीर पाटील, मनीषा पाटील आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. प्रा. जितेंद्र मेतकर यांनी सूत्रसंचालन केले.

आज सोमवार (ता.२७) रोजी मविप्र समाज संस्थेचे अध्यक्ष व जलदूत डॉ. तुषार शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली 'जिंकणारा समाज घडविण्यासाठी' या विषयावर व्याख्यान होणार असून राज्यात असामान्य कर्तुत्व गाजवणाऱ्या व्यक्तिमत्वास 'वसंत गौरव पुरस्कार' दिला जाणार आहे. 

Web Title: satana vivek ghalsasi speech news