सोनारीच्या तरुणाची कलाकृती "सातासमुद्रापार' 

अमोल कासार
बुधवार, 3 एप्रिल 2019

सोनारीच्या तरुणाची कलाकृती "सातासमुद्रापार' 

सोनारीच्या तरुणाची कलाकृती "सातासमुद्रापार' 

जळगाव : ग्रामीण भागातील रहिवासी.. घरची परिस्थिती जेमतेम.. अशात शिक्षणाला पुरते पैसे नाही, तर कलेची आवड कशी जोपासणार, हा प्रश्‍नच.. अशा स्थितीतही जिद्दीने पंधरा वर्षे कलेची जोपासना करणारा सोनारी (ता. जामनेर) गावचा तरुण अपार मेहनत घेतो.. आणि कालांतराने त्याची कलाकृती सातासमुद्रापार पोचून त्यांना जगभरातून मागणी होते.. आणि त्यानेच साकारलेल्या "ग्रॅव्हिटी इन स्पेस' या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीसाठी एका प्रेमीने तब्बल 16 लाख रुपये मोजले... 
जामनेर तालुक्‍यातील सोनारी गावातील जितेंद्र सुरळकर या तरुणाला चित्र रेखाटण्याची आवड होती. शालेय जीवनापासूनच ही आवड असल्याने त्याने शालेय जीवन पूर्ण केल्यानंतर सहा वर्ष स्कूल ऑफ आर्ट येथे फाईन पेंटिंग फ्री लास्ट आर्टफिशीयलचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जितेंद्र यांनी आपल्यातील कला ही रेखाटण्यास सुरवात केली. आतापर्यंत जितेंद्र यांनी 6 हजारांपेक्षा अधिक मॉडर्न आर्ट, क्‍युबी ड्रॅगन, कॅनव्हास आर्ट यासह विविध प्रकारचे चित्र त्यांनी रेखाटले आहे. 

कलाकृतींचे विदेशातही प्रदर्शन 
जितेंद्र यांनी तयार केलेल्या फाईन आर्ट यासह विविध पेंटींग्सचे पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क, कुबेर, श्रीलंका, आयर्लंड, दुबई, सिंगापूर, साउथ आफ्रिका, बलुचिस्तान, साउथ कोरिया या अकरा देशांसह भारतातील अनेक महानगरांमध्ये त्यांच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरविले गेले आहे. 

25 हावभावांच्या 100 कलाकृती 
कलेच्या क्षेत्रात जितेंद्र यांना 25 वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी अहमदाबाद येथे "अहमदाबादनी गुफा' या कार्यक्रमात एकाच वेळी शंभर कलाकृती साकारल्या. यामध्ये त्यांनी 25 पेक्षा अधिक हावभाव असलेले चित्र तयार केल्याने त्यांना हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले. 

आव्हानात्मक स्थिती मांडण्याचा प्रयत्न 
अजिंठा लेणीला 200 वर्षे पूर्ण झाल्यामुळे श्री. सुरळकर यांनी अजिंठा लेणीतील विविध भावचित्रे रेखाटून त्याचे प्रदर्शन जहॉंगीर आर्ट गॅलरीत भरविण्यात आले होते. तसेच समाजात जीवन जगणाऱ्या सर्व सामान्यांना येणारी आव्हानात्मक परिस्थिती श्री. सुरळकर हे आपल्या कलेतून मांडण्याचा त्यांनी संकल्प केला असून त्यानुसार ते आपल्या प्रत्येक पेटींग्समध्ये ते संकल्पपूर्ती करीत आहे. 

पुलवामातील शहिदांना श्रद्धांजली 
सोनारी येथे आपल्या मूळ गावात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 44 जवानांचे जितेंद्र सुरळकर यांनी चित्रे रेखाटली. त्यानंतर गावात कॅंडल मार्च काढून शहिदांना चित्रांच्या माध्यमातून त्यांनी श्रद्धांजली दिली. 

पाच हजार कलाकृती गेल्या वाहून 
जितेंद्र सुरळकर हे गेल्या 20 वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांनी तयार केलेल्या सुमारे पाच हजार कलाकृती मुंबईत 2005मध्ये आलेल्या अतिवृष्टीत वाहून गेल्या. या परिस्थितीत ते न डगमगता त्यांनी पुन्हा आपल्या कलेच्या जोरावर एक यशस्वी विक्रम गाठला आहे. 
 

Web Title: satasamudrapar kalakruti