करणी सेनेचा जलसमाधीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सातपूर - पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराणा प्रताप क्रांतिदल या संघटनांनी बुधवारी (ता. २४) गंगापूर धरणावर जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांचा फौजफाटा तैनात असल्याने पोलिसांनी ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

गंगापूर धरणात आज दुपारी एकला जलसमाधी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला. सकाळपासूनच करणी सेनेचे पदाधिकारी गंगापूर धरण परिसरात पोचत होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी ग्रामीण पोलिसांनीही धरणाच्या प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सोबत राखीव दलाची तुकडीही मदतीला होती. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जलसमाधी आंदोलन करण्यास परावृत्त केले. परवानगी नाकारल्याने करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत ‘भन्साळी मुर्दाबाद’, ‘ पद्मावत प्रदर्शित होऊ देणार नाही,’ ‘मातेचा अपमान सहन करणार नाही,’ अशी घोषणाबाजी केली. तसेच, न्यायालयाच्या निर्णयाविरुद्धही रोष व्यक्त केला. तहसीलदार राजश्री अहिरराव व पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिल्याशिवाय जलसमाधी आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा करणी सेनेने घेतला. जलसमाधी आंदोलनाला परवानगी नाकारल्याने पोलिस व करणी सेनेत वाद झाला. आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: satpur nashik news karani sena water samadhi trying