जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या सायली अहिरेची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

सटाणा : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सायली कारभारी अहिरे या विद्यार्थिनीने राज्य शासनाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नाशिक विभागाचे नेतृत्व करताना स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. यामुळे सायलीची आता राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मविप्र समाज संस्थेतर्फे नाशिक येथे सायलीचा सत्कार करण्यात आला. 

सटाणा : येथील मविप्र संचलित जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सायली कारभारी अहिरे या विद्यार्थिनीने राज्य शासनाकडून नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत नाशिक विभागाचे नेतृत्व करताना स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. यामुळे सायलीची आता राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मविप्र समाज संस्थेतर्फे नाशिक येथे सायलीचा सत्कार करण्यात आला. 

ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडीअममध्ये राज्य शासनातर्फे नुकत्याच राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या. जिल्ह्यातून सहा विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. जिजामाता गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सायली अहिरे हिने ६० - ६३ किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात पुणे येथील समृद्धी जगदाळे या विद्यार्थिनीस ५ - ० असे नमवून स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले. या विजयामुळे येत्या महिनाभरात होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली. सायलीला क्रीडाशिक्षक डी. एम. राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या परीक्षेत इतर मागास प्रवर्गातून जिजामाता हायस्कूलची माजी विद्यार्थिनी प्रांजल सोनवणे या विद्यार्थिनीने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे सरचिटणीस निलीमाताई पवार व अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या हस्ते नाशिक येथे संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात विद्यालयाच्या सायली व प्रांजल या दोन्ही विद्यार्थिनींनी मिळविलेल्या या यशाबद्दल सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.  

यावेळी संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघोनाना अहिरे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, संचालक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विश्राम निकम, अशोक पवार, नामदेव महाले, जयंत पवार, भाऊसाहेब खातळे, उत्तम भालेराव, दत्तात्रेय पाटील, प्रल्हाद गडाख, दिलीप पाटील, रायभान काळे, हेमंत वाजे, सचिन पिंगळे, नानासाहेब भामरे, गुलाब दाते, नंदा सोनवणे, शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे, प्राचार्या एस. बी. मराठे, उपप्राचार्य एस. जी. भामरे, क्रीडाशिक्षक डी. एम. राठोड, प्रा. डी. जे. गायकवाड आदी उपस्थित होते.

सायली अहिरेची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून आई, वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिक्षणाबरोबर शेतमजुरी करून सायली आपल्या आई - वडीलांना हातभार लावत असे. लहानपणापासूनच तिला खेळाची विशेष आवड असल्याने शालेय स्तरावर ती क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायची. तिच्या अंगी असलेली जिद्द, चिकाटी व चपळतेमुळे प्रभावित झालेल्या क्रीडाशिक्षक डी. एम. राठोड यांनी तिला क्रीडाक्षेत्रात करीयर करण्याविषयी प्रवृत्त केले. इयत्ता नववीत असताना सायलीने बॉक्सिंग प्रकारात राज्यस्तरावर सहभाग घेत यश मिळविले होते. तर दहावीत असताना राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक मिळविला होता. आता अकरावीत असताना तिने थेट राज्यस्तरीय अजिंक्यपद मिळवून मोठे यश संपादन केले आहे.

Web Title: sayali ahire drom jijamata girls school selected in state level boxing competition