PHOTOS : भारत भ्रमणावेळी स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श झालेले हेच 'ते' गाव 

आनंद बोरा : सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सायखेड्याची लोकवस्ती पंधरा हजार इतकी आहे. भवानी पेठेमधील जवळपास सर्वच घरांत मंदिर अथवा पिराचे स्थान आहे. गावात पूर्वी विंचूरकर वाडा ते नदीवरील घाटापर्यंत दगडी रस्ता होता. गावात फेब्रुवारीमध्ये शनी महाराजांचा यात्रोत्सव होतो. त्याचे लोकनाट्य तमाशा, कावडी नृत्य आणि कुस्त्यांची दंगल आकर्षण असते.

नाशिक : गोदाकाठच्या सायखेडा (ता. निफाड) गावाला भारत भ्रमणावेळी स्वामी विवेकानंदांचा पदस्पर्श झाला आहे. कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांनी गावाला "क्रीम ऑफ व्हिलेज', असे म्हटले होते. सरदार विंचूरकरांची उपराजधानी इथे होती आणि मठ व कुलपांसाठी हे गाव प्रसिद्ध होते.

Image may contain: sky, outdoor, nature and water

सरदार विंचूरकरांची उपराजधानी 

देशातील पहिला चलचित्रपट "कालिया मर्दन'चे चित्रीकरण इथेच झाले आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी गावाला भेट दिलीय. 
गावात आरोग्य उपकेंद्र असून, 115 प्रकारचे व्यवसाय चालतात. गावातील मेंढीबाजार उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सायखेडा कुलूप हे महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्याचे कारखाने होते. या गावाला पूर्वी श्‍यामराज तीर्थदेखील म्हटले जात होते. त्यासंबंधीचा उल्लेख "ज्ञानेश्‍वरी'मध्ये आहे. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या सायखेडियामुळे गावाचे नाव सायखेडा असे झाल्याचे अभ्यासक सांगतात. सरदार विठ्ठल शिवदेव दाणी अर्थात, सरदार विंचूरकर यांच्या जहागिरीचे हे गाव होते. तीनशे वर्षांपूर्वीचा त्यांचा वाडा गावात होता. तो आता नामशेष झाला असून, त्याच्या भिंती दोन मीटर रुंद असल्याचे ज्येष्ठांचे म्हणणे आहे.

Image may contain: indoor

मठ, कुलपांसाठी प्रसिद्ध गाव 

वाड्यातील लाकडी कोरीव काम सुंदर होते. गावाला चारही बाजूने तट होते. चार वेशी होत्या. त्यातील दोन वेशी अस्तित्वात आहेत. पूर्वी वेशीतील दिंडी दरवाजा उघडला जायचा. शिवाय इथे पूर्वी चिंचबन होते. गावात लक्ष्मीनारायण आणि गोपालकृष्ण मंदिर दोनशे वर्षांपूर्वीचे असून, या मंदिरातील भिंतीवरील नैसर्गिक रंगांनी रंगवलेली चित्रे थक्क करतात. हे चित्रे पाहण्यासाठी पर्यटक, अभ्यासक गावात येतात. नदीकाठचे नरसिंह मंदिर जुने असून, मठाधिपती रघुनंदनदास महाराज इथे वास्तव्यास आहेत. बालाजी, श्रीकृष्ण, श्रीराम, हनुमान, विठ्ठल-रुखमाई, शनी, गणपती, खंडेराव अशी मंदिरे आणि एक मशिद गावात आहे. 

Image may contain: house and outdoor

लोकनाट्य तमाशा, कावडी नृत्य आणि कुस्त्यांची दंगलचे आकर्षण

सायखेड्याची लोकवस्ती पंधरा हजार इतकी आहे. भवानी पेठेमधील जवळपास सर्वच घरांत मंदिर अथवा पिराचे स्थान आहे. गावात पूर्वी विंचूरकर वाडा ते नदीवरील घाटापर्यंत दगडी रस्ता होता. गावात फेब्रुवारीमध्ये शनी महाराजांचा यात्रोत्सव होतो. त्याचे लोकनाट्य तमाशा, कावडी नृत्य आणि कुस्त्यांची दंगल आकर्षण असते. गावात पहिली ते चौथीपर्यंतची जिल्हा परिषदेची प्राथमिक, तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे महाविद्यालय आहे. 1971 पासून गावात बॅंकेची शाखा असून, कांद्याची समोठी बाजारपेठ गावात आहे. गावात 1964 मधील नूतन सार्वजनिक वाचनालय कार्यरत असून, वीस हजार पुस्तकांची संपदा वाचनालयात आहे. गावात व्यायामशाळा आहे. ग्रामपंचायतीच्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो.

Image may contain: one or more people, people sitting and indoor

तीस वर्षांपूर्वी सर्वाधिक प्राथमिक शिक्षकांचे गाव

इथले भजनी मंडळ पंचक्रोशित प्रसिद्ध आहे. सोमनाथ डावखर, सुरेश देशमानकर, लहानू कुटे, रतन कुटे आदींचा त्यात सहभाग असतो. भीमाजी कुटे, लीलाधर कुटे, अर्जुन कापडी, विठ्ठल ससाणे, रामनाथ बोडके हे मल्ल यांच्यासह प्रकाश भुतडा आणि निर्मलाताई खर्डे हेही या गावचे. प्राचार्य रामदास गुजराथी याच गावातील होत. आशिया खंडातील ग्राहक संघटनेचे ते उपाध्यक्ष होते. गावात तीस वर्षांपूर्वी सर्वाधिक प्राथमिक शिक्षकांचे हे गाव होते. शशीराव पाटील गुरुजींना राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि पोलिस या गावातील आहेत. डी. ई. कुटेसर सायखेडाचे "विकीपिडिया' म्हणून ओळखले जात होते. इब्राहिम शेख हे सहकाराचे गाडे अभ्यासक होते. भजन, कीर्तन म्हणणारे इब्राहिम भाई पंचक्रोशित ओळखले जात होते. 

Image may contain: indoor

हेही वाचा > खिचडी खायला मिळणार म्हणून खूश होती मुले....पण त्यावेळी...

आदर्श वाचनालयात गावातील वाचनालयाचा समावेश

गावात अनेक मंदिरे आणि मठ आहेत. जिल्ह्यातील आदर्श वाचनालयात आमच्या गावातील वाचनालयाचा समावेश आहे. गावाचा अभ्यास करत एक पुस्तक लिहण्याचा आमचा मानस आहे. तसेच मंदिरांमधील दोनशे वर्षांपूर्वीच्या चित्रांचा अभ्यास होणे आवश्‍यक आहे. स्वामी विवेकानंद गावच्या बालाजी मठात आले होते. - दिलीप शिंदे (अभ्यासक) 
 

वाचा सविस्तर > उद्योजकाने 'त्याच्या'वर विश्वास ठेवला..अन् दिली गोपनीय माहिती..पण..

सायखेडा हे माझे जन्मगाव. गावातून दरवर्षी मी वडू बुद्रुक येथे अकरा वर्षांपासून पालखी घेऊन जातो. त्यात दोनशे जण सहभागी होतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे माझ्या व्याख्यानाचे विषय असतात. आतापर्यंत मी 26 हजार किलोमीटर सायकल चालविली आहे. 74 ट्रेक पूर्ण केले आहेत. सायकलीवरून सहाशे किलोमीटर अंतर 40 तासांत पार केले आहे. - डॉ. आबा पाटील (व्याख्याते)  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saykheda village is that Swami Vivekananda came during his visit to India Nashik Marathi News