आठ वर्षांत शिष्यवृत्तीचे पैसे नाहीत

संतोष विंचू
मंगळवार, 2 जुलै 2019

शाळांकडून माहिती घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी २० जुलैपर्यंत एन्ट्री न केलेल्या विद्यार्थ्यांची बॅंक खात्याची सविस्तर माहिती पोर्टलवर भरावी. शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.
- दिनकर पाटील,शिक्षण संचालक

येवला (जि. नाशिक) - पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकला की शिक्षक अन्‌ पालकांची छाती अभिमानाने फुगते; पण शिक्षण विभागाला मात्र याच्याशी देणेघेणे नसल्याचे दिसते; कारण गेल्या आठ वर्षांतील अनेक पात्र गुणवत्तांना अद्याप शिष्यवृत्तीच मिळालेली नाही. विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहिती शिक्षण संचालकांकडून मागविण्यात आली आहे.

पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत; तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत ही शिष्यवृत्ती दरमहा दिली जावी, असा निकष ठरलेला आहे. मात्र मागील आठ वर्षांत या शिष्यवृत्तीच्या वाटपात विस्कळितपणा आला असून, शुल्लक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला; तर अनेकांना शिष्यवृत्तीची रक्कमच माहित नाही.

ही रक्कम महिन्याला दोनशे रुपयांच्या आसपास इतकी तुटपुंजी असते. मात्र २०१० पासून थोड्या विद्यार्थ्यांना मिळाली; पण अनेकांना ही रक्कमच मिळाली नाही. त्यामुळे आता शिक्षण संचालनालयाने २०१० ते १८ या वर्षात उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा बॅंक खात्याची माहिती मागितली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scholarship Student Money