esakal | प्राथमिक शाळांच्या ओपनिंगवर पुन्हा प्रश्नचिन्ह 

बोलून बातमी शोधा

प्राथमिक शाळांच्या ओपनिंगवर पुन्हा प्रश्नचिन्ह 

प्राथमिक शाळेतील विद्यार्थी साडेअकरा महिन्यांपासून शाळेत गेलेले नाहीत. किंबहुना वर्षभर घरी असलेले विद्यार्थी पूर्णतः कंटाळले आहेत.

प्राथमिक शाळांच्या ओपनिंगवर पुन्हा प्रश्नचिन्ह 
sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : राज्यातील प्राथमिक शाळा १ मार्चपासून सुरू होतील, अशी दमदार चर्चा सुरू झाली. त्या अनुषंगाने खासगी, निमसरकारी, सरकारी शाळांमध्ये तयारीलाही वेग आला होता.

कोरोना चाचण्याही बहुतेक शिक्षकांच्या झाल्या होत्या. मात्र, पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्राथमिक शाळांच्या उघडण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आतातरी शाळा उघडतील याची कुणकुण लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर निराशेची लकेर उमटली आहे. 

बारा महिने शिक्षणापासून वंचित 
प्राथमिक शाळेतील विद्यार्थी साडेअकरा महिन्यांपासून शाळेत गेलेले नाहीत. किंबहुना वर्षभर घरी असलेले विद्यार्थी पूर्णतः कंटाळले आहेत. शिक्षणापासून वंचित आहेत. ऑनलाइन अभ्यासाची गोडी केव्हाच मनातून निघून गेली आहे. अभ्यासात मागे पडली आहेत. पहिलीत दाखल बहुतेक विद्यार्थ्यांची पाटी अद्यापही कोरीच आहे. इतर विद्यार्थ्यांचीही वाटचाल गंभीरच आहे. त्यांच्या शिक्षणाची चिंता पालक करीत आहेत. 

शाळा उघडण्याची नो आशा 
१ मार्चपासून शाळा सुरूच होतील. पुन्हा प्राथमिक शिक्षण नजरेत येईल, असा विश्वास व्यक्त होत होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने शाळा उघडण्याची आशा मावळत असल्याचे बोलले जात आहे. 

सर, आम्हाला शाळेत येऊ द्या! 
वर्षभर शाळेत न गेलेले विद्यार्थी शिक्षकांना शाळेत आलेले पाहतात. त्यांना भेटतात. ‘सर, आम्हाला शाळेत येऊच द्या. आम्हास काही होणार नाही,’ अशी भावनिक साद घालत आहेत. रोज शाळेत येत असलेल्या शिक्षकांच्या हाती असलेल्या खडू-फळ्याचे अंतर केव्हा कमी होईल, याकडे गुरुजींचेही लक्ष लागून आहे. दरम्यान, प्राथमिक शाळेतील बोलक्या भिंती निपचित पडल्या आहेत. त्यांनाही बोलक्या बालकांची आस लागली आहे, पण हा बोलक्यांचा शाळेतील चिवचिवाट केव्हा वाढेल, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.