शाळांवर आता क्रीडांगणांवरून संक्रात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

जिल्ह्यात सर्व शाळांचे मैदानाच्या क्षेत्रफळासह अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता अहवाल मिळाल्यानंतर अशा शाळांची मान्यता सुरू ठेवायची की नाही किंवा काय करायचे याबाबत चर्चा करण्याचे सांगितले आहे. 
- प्रवीण पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक).

धुळे - जिल्ह्यातील शाळांवर आता क्रीडांगणाच्या जागेवरून संक्रांत येणार आहे. निकषानुसार दोन एकरपेक्षा जास्त मैदान नसलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची माहिती शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी मागविली आहे. अशा शाळांविरूध्द मान्यता रद्‌द करण्याची कारवाई का करू नये? असा प्रश्‍न गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत उपस्थित करीत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये मैदानच उपलब्ध नसल्याने अक्षरशः कोंडवाडयाचे स्वरूप प्राप्त झाल्याची तक्रार आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. यासंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात मुद्दे मांडण्यासाठी मान्यताप्राप्त शाळा असूनही ज्या शाळांकडे विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान नाही. अशा शाळांची नावासह यादी तसेच ज्या शाळांकडे खेळाचे मैदान आहे अशा शाळांची मैदानाच्या क्षेत्रफळासह यादी पाठवावी अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 

"तालुक्‍यातील एकूण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची नावांसह यादी, माध्यमिक शाळा संहितेतील अटींची पूर्तता करणाऱ्या शाळांची यादी याबाबत व्यक्तिशः लक्ष घालून या शाळांची मान्यता चालू ठेवावी का ? माध्यमिक शाळा संहितेतील अटींची पूर्तता न करणाऱ्या शाळांची शासकीय मान्यता रद्द करावी किंवा कसे ? याबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयास सात दिवसात दोन प्रतीत अहवाल सादर करण्याच्याही सूचना आहेत. मान्यताप्राप्त असूनही ज्या शाळांकडे विद्यार्थ्यांसाठी खेळाची मैदाने नाहीत अशा शाळांची नावासह यादी, मैदान असेल तर मैदानाच्या क्षेत्रफळासह माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: school play ground