राज्यातील शाळा 17 जूनला सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि सैनिक शाळा 2019-20 या शैक्षणिक वर्षात 17 जूनपासून, तर विदर्भात 26 जूनपासून सुरू होतील. दिवाळीच्या सुट्या 21 ऑक्‍टोबर 2019 पासून सुरू होणार आहेत.

नाशिक - राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि सैनिक शाळा 2019-20 या शैक्षणिक वर्षात 17 जूनपासून, तर विदर्भात 26 जूनपासून सुरू होतील. दिवाळीच्या सुट्या 21 ऑक्‍टोबर 2019 पासून सुरू होणार आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे आज उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये सुसूत्रता यावी म्हणून सुट्यांचे धोरण स्पष्ट करण्यात आले. 1 मे 2019 ला महाराष्ट्र दिन साजरा करून माध्यमिक शिक्षणाधिकारी नियोजन करून उन्हाळ्याच्या सुट्यांच्या सूचना देतील. माध्यमिक शिक्षणाधिकारी संघटनांची बैठक घेऊन सुट्यांचे नियोजन करतील. उन्हाळ्याची, दिवाळीची दीर्घ सुटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ सणांसाठीच्या सुट्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने घेता येतील. मात्र, सर्व प्रकारच्या सुट्या 76 दिवसांपेक्षा अधिक होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. शैक्षणिक वर्षात 230 दिवसांचे अध्यापन होईल, याची काळजी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना घ्यावी लागेल.

सार्वजनिक सुट्या बंधनकारक
मुख्याध्यापकांनी आपल्या अखत्यारीतील स्थानिक सुट्या शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला निश्‍चित करून त्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना कळवायच्या आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी निश्‍चित करतील त्या स्थानिक आणि राज्य सरकारकडून जाहीर होणाऱ्या सार्वजनिक सुट्या शाळांना बंधनकारक राहतील.

Web Title: School Start 17th June