विज्ञान प्रदर्शनामध्ये सौरऊर्जेचा जागर

विज्ञान प्रदर्शनामध्ये सौरऊर्जेचा जागर

जिल्हा विज्ञान प्रदर्शनाला सुरवात; वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा - जिल्हाधिकारी

धुळे - विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जग गतिमान होत आहे. अशा परिस्थितीत रूढी आणि परंपरा जोपासताना पाळल्या जात असलेल्या अंधश्रद्धेतून आपण बाहेर पडले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी केले. 

येथील नूतन पाडवी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत ३८ व्या जिल्हा विज्ञान प्रदर्शन व ग्रंथोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य हे सर्व प्रकल्प हे सौरऊर्जेला प्राधान्य देत तिचा प्रभावी वापर करण्याचे सुचविणारे आहेत.

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रंजिता धिवरे उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनांतर्गत सकाळी शिक्षणाधिकारी कार्यालयापासून ग्रंथ व विज्ञान दिंडीला सुरवात होऊन नूतन पाडवी विद्यालयात उद्‌घाटन झाले.  

श्री. पांढरपट्टे म्हणाले,‘‘भूत, भानामती हे मनाचे खेळ आहेत. त्याला विज्ञानाचा कोणताही आधार नाही. विज्ञानाला पुराव्याची गरज असते. विज्ञान व पुस्तक वाचन केल्यास अंधश्रद्धा दूर होतात.’’  शिक्षणाधिकारी पाटील यांनी प्रास्ताविक केले. साहित्यिक सुभाष अहिरे यांनी गीतरामायण 
सादर केले. 

मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विजय बोरसे, शिक्षणविस्तार अधिकारी भावना पाटील, डी. बी. पाटील, वासंती पवार, शैलजा देवकर, एम. जी. सोनवणे, शिक्षक संघाचे अध्यक्ष जे.बी. सोनवणे, प्रल्हाद साळुंखे, एन. बी. पाटील, मुख्याध्यापक नानासाहेब देवरे आदी उपस्थित होते. ग्रंथदिंडीत परिसरातील १६ शाळांनी सहभाग नोंदविला.  पहिल्या दिवशी आज प्रदर्शनात बालकुमार कवी संमेलन झाले, तर उद्या प्रश्‍नमंजूषा, परिसंवाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होईल. बुधवारी (ता. २५) वादविवाद स्पर्धा, कथाकथन व प्रदर्शनाचा समारोप होईल.

(संकलन - प्रा. दीपक बाविस्‍कर)

प्रदर्शन २५ पर्यंत खुले
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुकास्तरावर यशस्वी झालेले ३२ वैज्ञानिक उपकरणे, २० शैक्षणिक साहित्य यांचा समावेश केला आहे. हे प्रदर्शन २५ जानेवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरू राहील. 
 

सौरऊर्जेवर चालणारी सायकल ठरतेय प्रदर्शनाचा केंद्रबिंदू
ऊर्जास्त्रोतातील महत्त्वाची ऊर्जानिर्मिती सौरऊर्जेतून होऊ शकते, याचे महत्त्व सांगणारी तसेच पर्यावरण संरक्षणास पोषक अशी सौरऊर्जेवर चालणारी सायकल प्रदर्शनात जयहिंद माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी दिग्विजय भामरे याने तयार केली आहे. एस. यू. पावरा, एस. यू. अर्थेकर यांचे मार्गदर्शन लाभले.  जिल्हाधिकाऱ्यांनी याच सायकलीवर फेरफटका मारत प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. 

बहुउद्देशीय शेती उपकरण
सी. डी. देवरे हायस्कूल म्हसदी येथील विद्यार्थी भावेश देवरे याने या उपकरणाची मांडणी केली संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारे उपकरण असून, औषध फवारणी, बी पेरणी, रोटाव्हेटर, चाळणी आदी कामे करता येतील. विज्ञान शिक्षक जी. एल, कांगणे, जी. आर. देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

फवारणी यंत्र
चिंचखेडे येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयाचा जयेश बागूल या विद्यार्थ्याने सौरऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी यंत्राची निर्मिती केली आहे. पी. एन. अमृतकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

बटाटे वेफर्स कटर
महिलांच्या कष्टाला हातभार व वेळेच्या बचतीसाठी बटाटे वेफर्स कटाई मशिन सौरऊर्जेवर चालवून ऊर्जाबचतीचा संदेश देणारे उपकरण एन. डी. मराठे विद्यालय, शिंदखेडा येथील रोहिणी साळुंखे या विद्यार्थिनीने तयार केली. रणजित गिरासे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com