"पापी पेटका सवाल" पोटापाण्याच्या शोधात त्याने केला 'हा' गुन्हा

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

सनी रोजगाराच्या शोधात नाशिकमध्ये आला होता. दिवसभर रोजगार शोधत फिरल्यानंतर रात्रीच्या वेळी तो गंगाघाटावर थांबत असे. रविवारी (ता. 17) मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास तो रविवार कारंजा येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या एटीएममध्ये बॅंकेचा ग्राहक बनून आत शिरला. त्यावेळी त्याने त्याच्याकडील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्राच्या पत्र्यावर घाव घातला. त्यामुळे यंत्राचा पत्रा कापला गेला. 

नाशिक : उत्तर प्रदेशातून नाशिकमध्ये रोजगाराच्या शोधात आलेल्या एका तरुणाने रविवार कारंजा येथील पंजाब नॅशनल बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी रात्रीचे गस्तीपथक (बीट मार्शल) त्याठिकाणी आल्याने त्याची तारांबळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत शटर बंद करून फौजफाटा बोलावत त्यास अटक केली. 

Image may contain: one or more people and indoor

एटीएममधील हालचाली संशयास्पद वाटल्याने चोराला आत कोंडले

सनी रावत (वय 19) असे या तरुणाचे नाव असून, तो रोजगाराच्या शोधात नाशिकमध्ये आला होता. दिवसभर रोजगार शोधत फिरल्यानंतर रात्रीच्या वेळी तो गंगाघाटावर थांबत असे. रविवारी (ता. 17) मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास तो रविवार कारंजा येथील पंजाब नॅशनल बॅंकेच्या एटीएममध्ये बॅंकेचा ग्राहक बनून आत शिरला. त्यावेळी त्याने त्याच्याकडील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्राच्या पत्र्यावर घाव घातला. त्यामुळे यंत्राचा पत्रा कापला गेला, मात्र रोकड भरलेला ट्रे त्याला काही काढता आला नाही. त्याच दरम्यान, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे बीट मार्शल भगवान गवळी व होमगार्डचा जवान दुचाकीवरून गस्ती घालत त्याठिकाणी आले. एटीएममधील सनीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने ते सावधगिरी बाळगत व प्रसंगावधान राखत एटीएम केंद्राजवळ पोचले आणि एटीएमचे शटर खाली ओढत सनीला आतमध्ये कोंडले. त्यानंतर श्री. गवळी यांनी नियंत्रण कक्ष आणि पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती देत तत्काळ जादा कुमक पाठविण्याचा बिनतारी संदेश दिला.

Image may contain: 3 people, people standing

रविवार कारंजा परिसरात गस्ती पथकाने पकडले 

संदेश मिळताच काही वेळातच अतिरिक्त फौजफाटा एटीएमसमोर दाखल झाला. केंद्राच्या परिसरात कडे करून व रस्त्यावर वाहने उभी करून रस्ता रोखण्यात आला. पोलिसांनी सावधगिरी बाळगत शटर उघडत सनी यास शिताफीने अटक केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शहरात पुन्हा एकदा एटीएम लुटीचा चोरट्याचा प्रयत्न फसला असला, तरी या प्रकारातून वाढत्या बेरोजगारीचे भयावह चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक धर्मेश पवार तपास करीत आहेत. संशयित सनी हा रोजगाराच्या शोधात नाशिकला आला होता. सध्या तो गंगाघाटावरच वास्तव्याला होता.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In search of employment committed a crime Nashik Crime Marathi News