नाशिकच्या रस्त्यांवर MH 04 च्या गाड्यांचा ओव्हरटेक!

Second hand cars buying in Nashik is being done on a large scale
Second hand cars buying in Nashik is being done on a large scale

येवला : अलिशान बंगला अन् त्याच्यासमोर टुमदार उभी असलेली गाडी... हे स्वप्न कुणाचे नसते. पण खिशाला परवडत नाही म्हणून अनेकांना या आकांक्षेला मुरड घालावी लागते. मात्र नाशिकसह जिल्हाभरातील जुन्या चारचाकी वाहनांच्या बाजाराने अनेकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे मुंबईतील गाड्यांनी देखील या बाजारावर कब्जा केला असून, ग्राहकही या गाड्यांवर फिदा होत असल्याने नाशिकच्या रस्त्यावर MH04 च्या गाड्यांचा धुराडा उडतांना दिसतो. याचमुळे नाशिकची जुन्या वाहनांची उलढाल 25 ते 30 कोटीवर असल्याचा अंदाज व्यक्त होतोय.

गेल्या चार, पाच वर्षात याठिकाणच्या बाजाराला चांगलीच तेजी आली आहे. अगदी 50 हजाराच्या चारचाकीपासून 50 लाखांपर्यंत चारचाकींची खरेदी-विक्री याठिकाणी होते. नव्या वस्तूंबरोबरच सेकंड हँड गाड्यांना मोठा ग्राहक असल्याने विक्रीतही वाढ झाली आहे. नाशिक शहरात 150 हून अधिक तर जिल्ह्यात 75 वर वाहन बाजार असून, त्यांची उलाढाल कोट्यवधी रुपयात पोहोचली आहे. विविध मॉडेल व कंपन्यांच्या गाड्या या मार्केटमध्ये बघायला मिळत असल्यामुळे ग्राहकांचा ओढाही वाढला आहे. नव्या गाड्यांच्या वाढलेल्या किमतीमुळे मध्यम कुटुंबीयांना शक्य नसले तरी जुन्या गाड्या सर्वांसाठी पर्याय ठरू पाहत आहे. ऑनलाइनवर विकल्या जाणाऱ्या कारमध्ये ग्राहक व विकणाऱ्यांचा संबध नसल्याने ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. पण वर्षानुवर्षे सुरु राहणाऱ्या वाहन बाजाराने आपली विश्वासार्हता निर्माण करत व्यवहार नागरिकांच्या पसंतीस उतरलेले नाहीत.

असा चालतो बाजार! 
या बाजाराचे मालक ज्यांना जुनी गाडी विक्री करायची त्यांच्याकडून किंमत ठरवून गाडी विक्रीला ठेऊन घेतात किंवा गाडी लावून घेतात व ग्राहक आला कि मालकाला बोलवून घेत दोघांचा व्यवहार घडवून आणतात.या बदल्यात 5 ते 25 हजाराच्या दरम्यान कमिशन त्यांना मिळते, विक्रेता व ग्राहकाना हक्काचे ठिकाण मिळत असल्याने हा व्यवसाय नाशिकमध्ये अनेकांचा मुख्य व्यवसाय बनला आहे. याशिवाय काही भांडवलदार बाजाराचे मालक मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून स्वतः गाड्या खरेदी करून आणतात व इकडे विक्री करतात.

मुंबईच्या गाड्या लोकप्रिय...
मुंबईतील चारचाकी गाड्या अल्प काळ वापरून विक्री करण्याचे प्रमाण जास्त आहे.शिवाय मुंबईची गाडी कमी वापरलेली असते व जुन्या गाड्यांचे दरही आवाक्यात आहेत.यामुळे अनेक ग्राहक मुंबईला जाऊन वाहने खरेदी करतात.शिवाय नाशिकच्या वाहन बाजारातही मुंबईच्या असंख्य गाड्या विक्रीला आहेत.मुंबईच्या गाडीचा पत्रा तेथील खार्या पाण्याने खराब होतो एवढीच एक तक्रार या गाड्यांच्या बाबतीत होते,मात्र वापर व किमत परवडणारी असल्याने नाशिककरांवर या गाड्यांनी मोहिनी घातली आहे. 

या गाड्या मिळतात बाजारात...
वाहन बाजारात मारुती, महिन्द्रा, टाटा, ह्युंदाई, जनलर मोटर्स, होन्डा, फोर्ड, टोयोटा अशा सर्वच प्रमुख वाहन कंपन्यांनाचे सेकंड हॅण्डम वाहने उपलब्ध आहेत. नाशिकमध्ये तर ऑडी, हमर, मर्सडीज, बीएमडब्लू, स्कोडा, फोरचुनर, पजेरो या नामांकित कंपन्याचे स्वतंत्र बाजार आहेत. या गाड्यांची किमत 30 ते 50 लाखांच्या दरम्यान आहेत. तसेच झायलो, स्विफ्ट, वॅगनार, अल्टो, संट्रो, आय टेन व 20, वर्णा, ओमनी, बोलेरो, तवेरा, लॉगऑन, फोर्ड फियेस्टा, पोलो, सफारी, सुमो या 2 वर्ष ते 12 वर्षांपर्यत वापरलेल्या गाड्या विक्रीला आहेत.

यामुळे वाहन बाजार फुल्ल..

  • नवे वाहन खरेदी शक्य नसल्याने जुन्याचा पर्याय
  • जेवढे बजेट तेवढ्या किमतीत मिळते कार
  • आवडीनुसार 1 वर्ष ते 12 वर्षांपर्यतच्या गाड्याची उपलब्धता 
  • जुन्या गाडीला विक्रेत्यांकडून कर्जाची उपलब्ध करून दिलेली सोय
  • वाहन तांत्रिकदृष्ट्या फिट करतानाच विकल्यानंतरही सदैव मदत
  • मुंबईतील गाडीचा कमी वापर व किंमती स्वस्त असल्याने पसंती
  • अनेकांना नव्या गाड्याची क्रेज असल्याने, चांगली गाडी किमी, फिरणं, वापर कमी असतांना होणारी विक्री
  • वाहन बाजारात अनेक पर्याय असल्याने पसंतीची संधी
  • गाडी मालक, मध्यस्थी खात्रीलायक असल्याने व्यवहार असलेली विश्वासाहर्ता

आकडे बोलतात...

  • नाशिकमधील नव्या गाड्यांचे शो रूम -15
  • नाशिकमधील बाजार - 150
  • जिल्ह्यातील बाजार - 80
  • महिन्याला एका बाजारातील गाड्याची विक्री - 15 ते 25
  • नाशिकमधील महिन्याची उलाढाल - 20 ते 25 कोटी
  • जिल्ह्यातील उलाढाल - 5 कोटीवर
  • मुंबईतील वाहन बाजार - 500 वर
  • मॉडेल व दर्जानुसार किमती - 50 हजार ते 50 लाखांपर्यत   

“किमतीसह दर्जातून नाशिकच्या बाजाराने वेगळी ओळख तयार केली आहे. दिवाळी, दसऱ्यामध्ये बाजार जोमात असतो. गेल्या चार, पाच वर्षांत येथील बाजारही तेजीत आला असून विक्रेत्यांची संख्या 150 वर पोहोचली आहे. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही ग्राहक खरेदीला येथे येतात.”
-प्रशांत घुगे, विजय खुळे, उत्कर्ष असोसिएट, नाशिक

“शहरातील सर्व भागात असे वाहन बाजार सुरु आहेत. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील पाच पर्यंत बाजार सुरु आहेत. ग्राहकांना अगदी नव्याशी मिळती जुळती गाडी कमी किमतीत मिळू लागल्याने नवी कार खरेदी न करू शकणाऱ्यांना हा जुना बाजार सोयीचा झाला आहे.”
- नीरज पिचा, रिलायबल अॅटो, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com