‘नकोशी’ प्राचीवर मायेची मनसोक्त पखरण

जिजाबराव बागूल
रविवार, 4 डिसेंबर 2016

बचतगटाने अर्भकाचे संगोपन करून लावली शिक्षणाचीही सोय

बचतगटाने अर्भकाचे संगोपन करून लावली शिक्षणाचीही सोय

खापर - सहा वर्षांपूर्वी कोण्या अज्ञात मातेला ‘नकोशी’ असलेले अवघ्या २१ दिवसांचे टाकून दिलेले अर्भक... दुर्दैव म्हणून एक माता ‘तिला’ कायमची कुठे तरी सोडून गेली अन्‌ दुसरीकडे तिच्यावर मायेची मनसोक्त पखरण करण्यासाठी बचतगटातील एक ‘यशोदा’ पुढे आली. त्याबरोबरच गटातील अनेक मातांचे वात्सल्य तिच्या अजाण आयुष्यात आले. त्यांनी तिचे लालनपालन, संगोपन आणि अगदी ‘प्राची’ हे तिचे नामकरणही त्यांनी थाटामाटात केले. पाहता पाहता सहा वर्षांचा काळ उलटला आणि आता प्राचीच्या शिक्षणाची सोयही या आभाळाएवढे अंतःकरण असलेल्या महिलांनी लावून दिली. विशेष म्हणजे या कामात पुढाकार घेणारी ‘यशोदा’ ही कोणी प्रगत शहर, गावातील नव्हे; तर दुर्गम भागातील महिला आहे. 

रतनबारा (ता. अक्कलकुवा) हे खापर पासून १२ किलोमीटर अंतरावरील एक दुर्गम गाव. रोजगाराअभावी स्थलांतर ही तेथील नित्याचीच समस्या आहे. अशाच एका मजूर जोडप्याने आपसांत झालेल्या बेबनावामुळे स्वतःच्या २१ दिवसांच्या अर्भकाला नदीकाठावर टाकून दिले. दोघांनी परस्परांपासून विभक्त होऊन चरितार्थासाठी गावाला कायमचा रामराम ठोकला. नदीकाठावर बेवारस पडलेल्या त्या अर्भकाला कलावती तडवी या महिलेने पाहिले. तिने जवळच शेत असलेल्या जमुनाबाई वसावे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर जमुनाबाईंनी तत्काळ या अर्भकाला स्वतःच्या पदरात घेऊन मायेची ऊब दिली. जमुनाबाईंनी ‘यशोदे’चे ममत्व अंगी बाणवत या ‘नकोशी’ अर्भकाला नवा जन्म दिला. जमुनाबाई या सामाजिक कार्याबरोबरच राजकारणातही सक्रिय आहेत. त्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य असून, त्यांचे पती प्रताप वसावे यांनीही प्राचीचा बरोबरीने स्वीकार, सांभाळ केला. 

पन्नास आयांची लेक
जमुनाबाईंनी गाईच्या दुधावरच तिचे संगोपन करीत नामकरणही केले ‘प्राची’... जमुनाबाई या एका सेवाभावी संस्थेत काम करतात. त्यांच्या बचतगटातील ५० सहकारी महिलांनीही प्राचीच्या संगोपनात खारीचा वाटा उचलला. त्यावेळी त्यातील काही स्तनदा मातांनी तर या अर्भकाला छातीशी लावून स्वतःचे दूध पाजले. बघता बघता प्राची ही पन्नास आयांची लाडाची लेक बनली. तिचा पूर्ण सांभाळ करण्याचा त्यांनी विडा उचलला. विशेष म्हणजे या सर्व महिलांनी प्राचीला दत्तक घेऊन तिचे शिक्षण व संगोपन करण्याचा निर्धार केला. 

अनेकांकडून संपर्क
नदीकाठावर पडलेल्या अर्भकासंदर्भात सविस्तर वृत्त एक जानेवारी २०११ ला ‘सकाळ’च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाले. त्यानंतर सांभाळ करणाऱ्या आईंवर व ‘सकाळ’वर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यावेळी संबंधित मुलीला दत्तक घेण्यासाठी राज्यभरातून अनेक पत्रे आली. काहींनी उत्सुकतेपोटी प्रत्यक्ष भेट घेऊन तिला दत्तक घेऊन तिचे संगोपन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यात पुणे येथील दोन धनाढ्य व्यक्ती, नंदुरबार येथील एक एलबीसीचे हवालदार आदींशी अनेकांचा संपर्क झाल्याचे जमुनाबाईंनी सांगितले. परंतु एकदा हाती घेतलेला वसा न टाकता प्राचीची संपूर्ण जबाबदारी जमुनाबाईंनी आतापर्यंत पेलली. 
 

पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश
यावर्षी प्राचीची एका प्रकल्पांतर्गत शिक्षणासाठी निवड झाली. कोकणठाम (जि. नगर) या नावाजलेल्या सर्व सोयींनी युक्त अशा पब्लिक स्कूलमध्ये पहिलीत प्रवेश होऊन तिच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला आणि प्राची खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहातही आली. जन्मदात्या आईला ‘नकोशी’ प्राची जमुनाबाई वसावे आणि पन्नास आयांना ‘हवीशी’ झाली. त्यांच्या वात्सल्याची ऊब तिला शैक्षणिक प्रवाहात आणती झाली. जमुनाबाई व तिचे पती प्राचीला भेटण्यासाठी दर महिन्याला शाळेत जातात. प्राचीच्या सर्व गरजाही ते पूर्ण करतात.

Web Title: self help group support to prachi