गर्भपाताच्या गोळ्या बेकायदा विक्री करणारे गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मेडिकल दुकानातील कामगाराकडून बेकायदा गर्भपाताच्या गोळ्यांची विक्रीची खबर मिळाली. त्यानुसार कारवाई केली आहे. शहरात अशी टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता असून त्यादृष्टिने तपास सुरू आहे. 

- विलास शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक,सरकारवाडा.

नाशिक : किमान सात आठवड्यांचा गर्भपात करण्यासाठीच्या गर्भपाताच्या गोळ्या तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री करणाऱ्या तिघांना सरकारवाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. मुख्य संशयिताने मेडिकल दुकान मालकाच्या अपरोक्ष अन्य दुकानातून एमटीपी गर्भपाताच्या गोळ्या बेकायदा विक्री करीत असल्याचे चौकशीतून समोर आले आणि त्यानुसार अन्य दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 
 
रमेश तुळशीराम पगारे (48, रा. सावतानगर, सिडको), स्वप्निल शिवाजी देशमुख (36, रा. आनंददर्शन सोसायटी, तारवालानगर, पंचवटी), विकास दिनकर चौधरी (36, रा. आशीर्वाद बंगला, शिवजेतनगर, पेठरोड, पंचवटी) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक जीवन जाधव यांच्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास शेळके यांना एम.जी. रोडवरील एका मेडिकल दुकानातील कामगार बेकायदेशीरित्या गर्भपाताच्या गोळ्याची विक्री करीत असल्याची खबर मिळाली होती. शेळके यांनी अन्न व औषध प्रशासन विभागासमवेत गुरुवारी (ता.6) रात्री साडेसातच्या सुमारास एम.जी. रोडवरील डेअरी डॉनसमोरील सुधा मेडिकल येथे सापळा रचला.

बनावट ग्राहक पाठवून संशयित रमेश पगारे याच्याकडे गर्भपाताच्या गोळ्यांची मागणी केली. त्यावेळी संशयित पगारे याने बनावट ग्राहकाकडून 2 हजार 400 रुपये घेतले आणि थांबण्यास सांगितले. त्यानंतर पगारे अर्धातासाने परत आला आणि त्यांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेत अटक केली. 
चौकशीमध्ये त्याने सदरच्या गोळ्या या गोळे कॉलनीतील केअरटेकर औषध एजन्सीत कामाला असलेल्या स्वप्निल देशमुख याच्याकडून 300 रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी स्वप्निल देशमुख यासही अटक केली. त्याच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांचे दहा स्ट्रिप्स्‌ मुंबईतील मनोज नामक व्यक्तीकडून 110 रुपयांना खरेदी केल्याचे सांगितले. यातील तीन स्ट्रीप त्याच्या ऍक्‍टिवाच्या डिक्‍कीतून जप्त केले तर चार स्ट्रिप त्याने संशयित विकास चौधरी यास विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी संशयित विकास चौधरी यालाही अटक केली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता 

गर्भपाताच्या गोळ्यांची बेकायदा विक्रीप्रकरणी अटक तिघेही मेडिकलच्या दुकानांतील कामगार आहेत. त्यांनी दुकानमालकाच्या अपरोक्ष या गोळ्याची विक्री केली आहे. 110 रुपयांची स्ट्रिप संशयित 2 हजार 400 रुपयांचा विक्री करीत होते. त्यामुळे शहरात अशारितीने गोळ्यांची विक्री करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता आहे. पोलिस तपासातून अशा टोळीचा भांडाफोड होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Selling Abortion Pills Illegally Three Arrested