सात नगरसेवकांची राऊतांच्या बैठकीला हजेरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नाशिक - विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला आज मोठा राजकीय झटका बसला. परिषदेच्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी आज उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी बोलाविलेल्या बैठकीला अवघ्या सात नगरसेवकांनी हजेरी लावल्याने शिवसेनेत नाराजांच्या गटाने बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. राऊत यांचा मनमानी कारभार, ऍड. शिवाजी सहाणे यांची शिवसेनेतून झालेली हकालपट्टी व अजय चौधरी यांना ज्या पद्धतीने नाशिकचा पदभार सोडावा लागला, त्यामुळे असंतोष वाढला असून, राऊत व विधान परिषदेसाठी घोषणा करण्यात आलेल्या नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी विरोधात महापालिकेच्या नगरसेवकांनी दंड थोपटले आहे.

शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विधान परिषदेची उमेदवारी येवल्याचे नरेंद्र दराडे यांना घोषित झाल्यानंतर अंतर्गत वाद अधिकचं विकोपाला गेला. महानगरप्रमुख पदाबरोबरच जिल्हा प्रमुख बदलाच्या हालचालींनादेखील वेग आला होता; परंतु ग्रामीण भागातून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर माघार घ्यावी लागली. अंतर्गत संघर्ष वाढत असतानाच जिल्हा संपर्क प्रमुख पदाची सूत्रे भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे देण्यात आल्याने नाराजी अधिक वाढली. त्या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेना कार्यालयात बैठक बोलाविली. गर्दी होत नसल्याने सकाळी दहा वाजता होणारी बैठक तब्बल अडीच तास उशिराने सुरू झाली. बैठकीला अवघे 37 पैकी सात नगरसेवक उपस्थित राहिल्याने निरोप देऊनही अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेत बंडाचे हत्यार उपसले आहे.

Web Title: seven corporator present to sanjay raut meeting politics