फेसबुकच्या माध्यमातून मोरेनगरच्या विद्यार्थ्यांना ७० हजारांची मदत!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

'पारिजात' सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोरेनगर (ता. बागलाण) येथील आय. एस. ओ. मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ७० हजार रुपयांचे शालेय साहित्य मोफत पुरवले असून संस्थेने यंदा मोरेनगर शाळेला दत्तक घेतले आहे.        

सटाणा : फेसबुकवर सहजरीत्या चॅटिंग करता - करता ओळख झालेल्या मुंबई येथील गुरुदास बाटे या सामाजिक कार्यकर्त्याने 'पारिजात' सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मोरेनगर (ता. बागलाण) येथील आय. एस. ओ. मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ७० हजार रुपयांचे शालेय साहित्य मोफत पुरवले असून संस्थेने यंदा मोरेनगर शाळेला दत्तक घेतले आहे.        
                                 
मोरेनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सोपान खैरनार यांचा फेसबुकवर चॅटिंगच्या माध्यमातून मुंबई येथील कलावंत व 'पारिजात' या मुंबईस्थित सेवाभावी संस्थेचे सचिव गुरुदास बाटे यांच्याशी गेल्या दोन वर्षांपूर्वी परिचय झाला होता. चॅटिंगमधून श्री. खैरनार यांना पारिजात संस्थेच्या सामाजिक कार्याविषयी माहिती मिळताच त्यांनी श्री. बाटे यांना संस्थेच्या माध्यमातून आपल्या शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली.

या विनंतीला प्रतिसाद देत पारिजात संस्थेचे गुरुदास बाटे, शशांक ठुकरुल, स्वप्नील पाथरे, विशाल गोळे, रोहन घालवळकर, श्रीशांत पारकर, मंगेश सावंत, राहुल शिंदे आदींनी संस्थेतर्फे मोरेनगर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल, रबर, चित्रकला वही, रंगपेटी, पट्टी आदी साहित्य स्वखर्चाने पाठविले. यावर्षी पारिजात संस्थेने मोरेनगर शाळा दत्तक घेतली असून संस्थेचे देश-विदेशातील सदस्य लवकरच शाळेला सदिच्छा भेट देणार आहेत.        
 
जिल्हा परिषदेच्या सदस्या मीना मोरे, पारिजातचे प्रतिनिधी कश्यप गोसावी, गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी पी. आर. जाधव, कैलास पगार, टी. के. घोंगडे, केंद्रप्रमुख मधुकर भामरे, सरपंच सुरेश जाधव, उपसरपंच भरत अहिरे, माजी सरपंच सुरेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य अनिता मोरे, बाळासाहेब देवरे , मनीषा अहिरे,  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाजी मोरे, माणिक मोरे, सखाराम मोरे, जितेंद्र देवरे, सतिष मोरे, कविता मोरे, ललित मोरे, प्रमिला बागुल, मुख्याध्यापक नारायण सोनवणे, सोपान खैरनार, भिकुबाई कापडणीस, वैशाली पवार, प्रतिभा अहिरे आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Seventy thousands help through facebook to students of Moranagar