अतिप्रसंग करून दिराने जीवे ठार मारले 

दीपक कच्छवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

सकृतदर्शनी पुरावा आणि विवाहितेच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या दिरासह सासू व सासूची आई (आजेसासू) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - देशसेवेसाठी सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानाच्या पत्नीवर दिराने अतिप्रसंग करून खून केला. मोठी भावजाई ही मातेसमान असते. मात्र, या भावनेने दिराने तिलांजली दिली. याप्रकरणी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, सकृतदर्शनी पुरावा आणि विवाहितेच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या दिरासह सासू व सासूची आई (आजेसासू) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुंझर (ता. चाळीसगाव) येथील विवाहिता प्रियंका रामचरण बैरागी (वय 27) हिने काल (4 जुलै) सकाळी सातच्यापूर्वी सासरी कुंझरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती प्रियंकाच्या माहेरी शिंदी (ता. भडगाव) येथे समजताच माहेरच्यांनी कुंझर गाठले. प्रियंकाच्या मामासह नातेवाइकांनी प्रियंकाला गळफास लावून ठार मारल्याचा संशय व्यक्त केला. घटनास्थळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप शिरसाठ व उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला होता. मृतदेह विच्छेदनासाठी सुरवातीला चाळीसगावला ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र, तिच्या माहेरच्यांनी केलेल्या मागणीनुसार, धुळे येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळणे बाकी होता. त्यामुळे याप्रकरणी सुरवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. आज मामांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत प्रियंकाचा दीर प्रवीण बैरागी, सासू लीलाबाई बैरागी व आजेसासू सुमनबाई बैरागी (रा. चिंचगव्हाण) या तिघांच्या विरोधात गुन्हाचा गुन्हा दाखल केला आहे. 

दिराने केला अतिप्रसंग 
पोलिसांनी सांगितले, मृत प्रियंकाच्या छातीवर ओरबडल्याच्या खुणा दिसून येत होत्या. शिवाय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे पोलिसांनी कालच दीर प्रवीणला चौकशीकामी ताब्यात घेतले होते. त्याने वहिनीवर अतिप्रसंग केला असावा व या घटनेची कुठेही वाच्यता होऊ नये, यासाठी त्याच्या आई व आजीने त्याला मदत केली असावी, असा पोलिसांचा संशय कायम आहे. त्यादृष्टीने त्यांनी तपास सुरू केला असून मृत प्रियंकाच्या सासू व आजेसासू फरार आहेत. दरम्यान, प्रियंकावर आज सायंकाळी साडेसहाला कुंझर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मुलांना लावले जमिनीला वारस 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रियंकाची मुले कु. दिशा (वय 5) व दादा (वय 3) यांना त्यांचे वडील रामचरण बैरागी यांच्या जमिनीला वारस लावण्यात आले आहे. शिवाय त्यांना मिळणाऱ्या पगारातून अर्धा पगार मुलांना देण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात 'नोटरी' करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल तीस तासांहून अधिक वेळानंतर मृत प्रियंकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

----

Web Title: sexual assault and murder case at mehunbare chalisgaon