रहिवासी शाहांनी चालविला अग्निशमन बंब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

धुळे - शहरातील रमजानबाबानगरात बुधवारी (ता. १) मध्यरात्री अडीचला आठ ते दहा घरांना लागलेली आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाने लवकर प्रतिसादच न दिल्याने एका नागरिकानेच फायर स्टेशनवरून थेट घटनास्थळापर्यंत अग्निशमन बंब चालवत नेल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

धुळे - शहरातील रमजानबाबानगरात बुधवारी (ता. १) मध्यरात्री अडीचला आठ ते दहा घरांना लागलेली आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलाने लवकर प्रतिसादच न दिल्याने एका नागरिकानेच फायर स्टेशनवरून थेट घटनास्थळापर्यंत अग्निशमन बंब चालवत नेल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन दलाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

आग लागल्यानंतर रमजानबाबानगरमधील काही नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दूरध्वनी केला. वारंवार फोन करूनही विभागाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. आगीचे रूप वाढत असताना नियंत्रणासाठी अग्निशमन दलाकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून काही नागरिकांनी थेट पांझरा नदी किनाऱ्यावरील गणेश मंदिरामागे असलेल्या महापालिकेच्या फायर स्टेशनकडे धाव घेतली. या ठिकाणी अग्निशमन दलाचा कुणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हता, असे संबंधितांचे म्हणणे आहे.

थेट बंबच नेला
फायर स्टेशनवर येऊनही तेथे कुणी अधिकारी, कर्मचारी नसल्याचे पाहून फिरोज शाह यांनी तेथे उभा असलेला एक बंबच आपल्या ताब्यात घेतला व थेट चालवून घटनास्थळी नेला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्या घरांवर पाणीही मारण्याचा प्रयत्न नागरिकांनीच केल्याचे सांगण्यात आले. 

सखोल चौकशी व्हावी
महापालिकेच्या अग्निशमन विभागाबाबत नेहमी तक्रारींचा सूर असतो. विभागात फोन कुणीही लवकर उचलत नाही, प्रतिसाद दिला जात नाही, अशा तक्रारी असतात. काही अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबतही अनेक तक्रारी आहेत. काही महिन्यांपूर्वी आयुक्त संगीता धायगुडे यांनी अचानक भेट दिली, त्यावेळी काही कर्मचारी जागेवरच नव्हते तर काहीजण नशेत आढळले होते. नंतर काही दिवसातच येथे अग्निशमन बंबातून डिझेल चोरीचा प्रकार समोर आला. आता थेट बंबच त्रयस्थ व्यक्ती चालवून घेऊन गेल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या सर्व प्रकरणी सखोल चौकशीची मागणी होत आहे. 
दरम्‍यान, रहिवासी िफरोज शाह यांच्या समयसूचकतेसह मदतीच्या धडपडीविषयी अनेकांकडून कौतुक होत आहे.

रमजानबाबानगरमध्ये आग लागल्याचा दूरध्वनी आल्यावर लगेचच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी बंब नेले. सुरवातीला दोन बंब गेल्यानंतर तिसरा बंबही रवाना झाला. चारपैकी एक बंब स्टेशनवर असतो. ड्युटीवरील सर्वच कर्मचारी घटनास्थळी गेले असताना एका नागरिकाने स्टेशनवर उभा एक बंब चालवत नेला. 

- तुषार ढाके, सहाय्यक अग्निशामक अधिकारी, महापालिका

Web Title: shaha against fire truck