विद्यार्थिनीही घेताहेत शाहिरीचे धडे

विद्यार्थिनीही घेताहेत शाहिरीचे धडे

नगरदेवळा (ता. पाचोरा) - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे येथे प्रथमच शाहिरी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे. १९ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीही शाहिरीचे प्रशिक्षण घेत आहेत. शिबिराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, शासनाच्या या उपक्रमाचे सार्थक होत असल्याचे मान्यवरांकडून कौतुक होत आहे. 

शाहीर शिवाजीराव पाटील व सहकाऱ्यांनी सुमारे चाळीस वर्षांपासून शाहिरी कला जिवंत ठेवली आहे. या शिबिरात वीस विद्यार्थी- विद्यार्थिनींचा सहभाग आहे. यात ‘शाहिरी परंपरेचा इतिहास व शाहिरीतील विविधांगाची ओळख’ या विषयावर शाहीर अनंतकुमार साळुंखे (सांगली), ‘राष्ट्रीय एकात्मता व महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेचा इतिहास’ यावर शाहीर विजय जगताप (इचलकरंजी), ‘शाहिरीचे प्रकार व प्रात्यक्षिक’ यावर शाहीर रंगराव पाटील (कोल्हापूर), ‘शिवकालीन शाहिरी व वर्तमानातील शाहिरीतील बदल’ याविषयी शाहीर बजरंग आंबी (सांगली), ‘भेदक व भक्तीरस प्रधान शाहिरीचे गुणवैशिष्टे’ याबाबत शाहिर रामचंद्र जाधव (सांगली), ‘स्वातंत्र्योत्तर काळातील शाहिरी क्षेत्रात महिलांचे योगदान’ या विषयावर शाहीर शीतल कापशीकर (पुणे), ‘पोवाडा सादरीकरणातील विविध गुणवैशिष्ट्ये व शाहिरी प्रवास’ यावर शाहीर विजय तनपुरे (राहुरी), ‘लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन कार्यात शाहिरी लोकगीतांचा सहभाग’ याविषयी डॉ. संगीता म्हसकर (जळगाव), ‘राष्ट्रीय एकात्मता व ऐतिहासिक पोवाड्यातील गुणवैशिष्टे’ या विषयी शाहीर सज्जनसिंग राजपूत (बुलडाणा), ‘भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात शाहिरांचे योगदान’ यावर शाहीर अंबादास तावरे (औरंगाबाद), ‘दूरदर्शन, आकाशवाणी या सह विविध प्रसारमाध्यरमातून शाहिरी सादरीकरणाचे तंत्र’ याबाबत शाहिर देवानंद माळी (सांगली) यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

यानिमित्ताने गावागावात जाऊन विद्यार्थी स्वतः पोवाड्यांचे गायन करीत आहेत. यशस्वीतेसाठी शाहीर शिवाजीराव पाटील, शाहीर नामदेव सोन्नी, बाबूराव मोरे, जितेंद्र भांडारकर, कुणाल राऊळ, कवी गो. शि. म्हसकर, योगेंद्र राऊळ, राजेंद्र जोशी, रामसिंग राजपूत, यु. पी. पवार, शरद महाजन, संजीव बावस्कर आदींचे सहकार्य लाभत आहे.

रविवारी होणार समारोप
१९ मार्चला सायंकाळी सहाला तिरोळे पाटील मंगल कार्यालयात होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रतिभासंपन्न शाहीर तसेच शाहिरी परंपरेचे सखोल अभ्यासक व तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. याप्रसंगी आमदार किशोर पाटील अध्यक्षस्थानी, तर सांस्कृतिक संचालक संजय पाटील, शाहीर परिषदेचे अध्यक्ष शाहीर दादा पासलकर प्रमुख पाहुणे राहतील. याप्रसंगी शिबिरार्थी आपला कलाविष्कार ‘रंग शाहिरी कलेचा’ हा दोन तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार करणार आहेत, असे शिबिर संचालक शाहिर शिवाजीराव पाटील यांनी कळविले आहे.

शिबिरार्थी म्हणतात... 

शाहिरीबाबत मनोबल वाढले 
साक्षी पाटील - शाहिरी प्रशिक्षण शिबिरात आम्हा विद्यार्थिनींना सहभागी होण्याची संधी मिळाली. ज्यातून आमच्या मनात शाहिरी रुजली अाहे. कार्यक्रमात प्रत्यक्ष सादरीकरणामुळे आमचे मनोबल उंचावले असून या शिबिरातून दररोज खूप काही शिकायला मिळत आहे. 

आत्मिक समाधानातून कला पुढे नेऊ
यश चव्हाण - कला ही भाकरीचा चंद्र शोधण्यास आयुष्यभर उपयोगी पडते. शाहिरीचे महत्त्व यातून कळाले असून ही कला कशी लोकोपयोगी आहे, हे दिसून आहे. एकूणच यात मिळणारे आत्मिक समाधान महत्त्वाचे ठरले असून ही कला आम्ही निश्‍चितपणे पुढे नेऊ. 

मार्गदर्शनातून ज्ञानात पडतेय मोलाची भर  
अक्षय महाजन - शाहिरी प्रशिक्षण शिबीर ग्रामीण भागात घेऊन आम्हा विद्यार्थ्यांना कलेविषयी जो लळा लावला, तो आयुष्यभर विसरु शकत नाही. या ठिकाणी मिळणारे शाहिरी विषयीचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. ज्यातून आमच्या ज्ञानात मोलाची भर पडत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com