लाँग मार्चमधील शकुबाईच्या वेदना शमेना, नथ गहाण ठेवून पायावर उपचार

दिगंबर पाटोळे
शनिवार, 27 एप्रिल 2019

शकुबाईची कौटुंबिक माहीती...
पन्नास वर्षापूर्वी पतीने दुसरा विवाह केल्यानंतर त्या मुलीसह वरखेडा येथे भाऊ साहेबराव वाघले यांच्याकडे राहात असून मोल मजुरी करुन मुलगी शोभा हीचे लग्न केले. मुलगी पिंप्री अचंला येथे असून शकुबाई ह्या सध्या वरखेडा येथेच झोपडीवजा घरात राहात आहे. त्यांची सध्या  शेजारीच राहाणारी लहाण बहिण बिबाबाई जाधव तसेच भाऊ साहेबराव वाघले हे दोघे शतमजुरी करणारे असून ते शकुबाईचा सांभाळ करीत आहेत.

वणी (नाशिक) : मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने वर्षाभरापूर्वी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढुन राज्यशासना बरोबरच देशभरातील जनतेचे लक्ष वेधून घेतलेल्या मार्चातील सहभागी ६८ वर्षीय महिलेचे रक्तबंबाळ झालेल्या पावलांच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. या जखमा बऱ्या व्हाव्यात यासाठी सावकाराकडे गहाण ठेवलेली नथ   सोडवता आलेली तर नाहीच, मात्र ज्यासाठी असह्यवेदना सहन करीत पायपीट केली ती वनजमिन अजूनही नावावर झाली नसल्याची खंत "त्या" निराधार माऊलीने व्यक्त केली आहे.

मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्यावतीने आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली ६ मार्च २०१८ रोजी संपूर्ण कर्जमाफी व्हावी, शेतमालाला हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, वनाधिकार कायद्याचीही अंमलबजावणी करा, वीज बीलमाफी मिळावी, ऊसाला हमीभाव बंधनकारक करावा, पश्चिमेत नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात यावे, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न सोडवावा आदी मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई (विधानसभा) लाँग मार्च काढला होता. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारा या माेर्चात वरखेडा (ता. दिंडोरी) येथील ६८ वर्षीय शकुबाई पंढरीनाथ वाघले ही वृध्द महिला सहभागी झालेली होती. नाशिक ते मुंबई असा सात दिवस २०० किमीची पायपीट करणाऱ्या वृध्द महिलेचे चालून चालून पायातील चपला तुटून गेल्या आणि तापलेल्या डांबरी रस्त्याचे चडके सहन करीत अनवाणी चालत जावून आझाद मैदान गाठले.

यावेळी शकुबाईंच्या तळपायाची संपूर्ण कातडी सोलून जावून पाय रक्तबंबाळ झाले होते. अशा स्थितीतही मोर्चा तून माघारी न पररता जो पर्यंत शासन मागण्या पूर्ण करीत नाही तो पर्यंत मी मेली तरी चालेल मी घरी परत जाणार नसल्याची ठाम भूमिका घेणाऱ्या शकुबाईने देशभरातील प्रसारमाध्यमां बरोबरच सोशल मिडीयाचे लक्ष वेधून घेतले होते. अशा शकुबाईची सकाळ प्रतिनिधीने भेट घेतली असता. लाँग मार्चला वर्ष उलटून गेले आहे. तरी शकुबाईचे पायाची जखम अजून भरलेली नसून अजूनही त्यांना लंगडच चालावे लागते. मोल मजुरी करणाऱ्या शकुबाई चार वर्षांपूर्वी अचानक आजारी होवून त्यांचे दोन्ही हातांचे बोटे आखडून वाकुन गेली आहेत. त्यामूळे त्यांना काम तर नाहीच मात्र हाताने निट जेवताही येत नाही. पायाचा इलाज करण्यासाठी शकुबाईने नाकातील नथ गहाण ठेवली आहे. जेष्ठ नागरिक पेन्शन योजनेतून हातात येणाऱ्या सहाशे रुपयातून घर खर्चही होत नाही. त्यामूळे गहाण ठेवलेली नथ कशी सोडवणार असा प्रश्न करीत ज्यासाठी पायपीठ केली ती वरखेडा शिवारात असलेली १ एकर वनजमिनही नावावर झाली नसल्याची खंत व्यक्त करीत परत मुंबईला लाल बावट्याने मोर्चा काढला तर परत जाण्याची तयारीही असल्याचे सांगत दिंडोरी लोकसभा निवडणूकीत उभ्या असलेल्या आमच्या गावित साहेबाला (आमदार जे.पी. गावित) निवडून आणण्यासाठी शक्य तेवढे घराच्या आजपास फिरुन प्रचार करीत असल्याचेही शकुबाईने सांगितले.

शकुबाईची कौटुंबिक माहीती...
पन्नास वर्षापूर्वी पतीने दुसरा विवाह केल्यानंतर त्या मुलीसह वरखेडा येथे भाऊ साहेबराव वाघले यांच्याकडे राहात असून मोल मजुरी करुन मुलगी शोभा हीचे लग्न केले. मुलगी पिंप्री अचंला येथे असून शकुबाई ह्या सध्या वरखेडा येथेच झोपडीवजा घरात राहात आहे. त्यांची सध्या  शेजारीच राहाणारी लहाण बहिण बिबाबाई जाधव तसेच भाऊ साहेबराव वाघले हे दोघे शतमजुरी करणारे असून ते शकुबाईचा सांभाळ करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shakubai participate in long march