पवारांची ‘शेतकरी दिंडी’ अन्‌ ठाकरेंची ‘जनआशीर्वाद यात्रा’

कैलास शिंदे, जळगाव
गुरुवार, 18 जुलै 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपल्या राजकारणाच्या प्रारंभाच्या काळात केलेल्या आंदोलनांपैकी १९८० मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन नागपूर विधीमंडळावर ‘शेतकरी दिंडी’ काढली होती. त्याचा प्रारंभ जळगावातून केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आपल्या राजकारणाच्या प्रारंभाच्या काळात केलेल्या आंदोलनांपैकी १९८० मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन नागपूर विधीमंडळावर ‘शेतकरी दिंडी’ काढली होती. त्याचा प्रारंभ जळगावातून केला होता. त्यावेळी या दिंडीमुळे राज्यात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. त्यानंतर पवार यांची राजकीय कारकीर्द अधिकच बहरली. कालांतराने त्यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्रिपदही मिळाले. आता शिवसेनेच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्यांचा प्रश्‍न घेऊन जनआशीर्वाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात काढणार आहेत. त्याची सुरवातही ते जळगावातून करणार आहेत. संजय राऊत यांनी आगामी विधानसभेत शिवसेनेकडे सत्ता आल्यास राज्याचे मुख्यमंत्री आदित्यच असतील, अशी घोषणाही केली आहे. त्यामुळे पवारांच्या शेतकरी दिंडीच्या धर्तीवर जळगावातून सुरू होणारी जनआशीर्वाद यात्रा आदित्य यांनाही मुख्यमंत्रिपदाचे यश देणार काय? हे विधानसभा निवडणुकीनंतरच दिसून येईल.

उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाचा जळगाव जिल्हा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एस काँग्रेसची स्थापना केली, त्यावेळी शेतकऱ्यांचे विविध प्रश्‍न घेऊन राज्यस्तरीय ‘शेतकरी दिंडी’चे आयोजन केले होते. नागपूर विधिमंडळावर लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा याद्वारे काढण्यात आला. त्याचा प्रारंभ जळगाव येथून केला होता. ७ डिसेंबर १९८० ला जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातून या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. जळगावातून सुरू झालेली ही पायी दिंडी नागपूर विधिमंडळावर धडकली. त्यावेळच्या सरकारने त्यांना शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली होती. या दिंडीमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यानंतर शरद पवार यांची राजकीय कारकीर्द बहरली, कालांतराने झालेल्या निवडणुकीत जनतेने त्यांना कौल दिला व ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले.. पुढे देशाचे संरक्षणमंत्री, कृषिमंत्रीही झाले.

उत्तर महाराष्ट्रातील याच जळगाव जिल्ह्याचा केंद्रबिंदू आता शिवसेनेच्या नजरेतही आला आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरवात जळगाव येथूनच करीत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ते यात्रा काढणार आहेत. राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून ही यात्रा जाणार आहे. या यात्रेत ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, त्यांचे प्रश्‍नही समजावून घेणार आहेत. 

आदित्य ठाकरेंची ही पहिलीच राज्यस्तरीय यात्रा आहे. ते युवा सेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी ज्याप्रमाणे आपल्या सुरवातीच्या राजकीय कारकिर्दीत जळगावातून शेतकरी दिंडीचा प्रारंभ केला होता. त्याचप्रमाणे ठाकरेंचीही जळगावातून जनआशीर्वाद यात्रेची सुरवात होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची सत्ता आल्यास मुख्यमंत्रिपदी आदित्य ठाकरेच असतील, अशी आज जळगावातील पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. त्यामुळे जळगावातून काढण्यात येणाऱ्या यात्रेचे मुख्यमंत्रिपदापर्यंत नेण्याचे यश आदित्य ठाकरेंनाही मिळणार काय? याचे उत्तर मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर जनताच देईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shetkari dindi and janaashirwad yatra in jalgaon