शिरपूरला होणार उद्या अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

शिरपूर (जि. धुळे) - सहकारमहर्षी शिवाजीराव गिरधर पाटील यांच्यावर दहिवद (ता. शिरपूर) येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सोमवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होतील.

शिरपूर (जि. धुळे) - सहकारमहर्षी शिवाजीराव गिरधर पाटील यांच्यावर दहिवद (ता. शिरपूर) येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सोमवारी (ता. 24) सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होतील.

शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता. अमळनेर) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. त्यांच्यासह ज्येष्ठ बंधू उत्तमराव पाटील, वहिनी लीलाताई पाटील विविध क्रांतिकार्यांत सहभागी होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात कार्यरत होते. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते कॉंग्रेसमध्ये सक्रिय झाले. शिरपूर तालुक्‍याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकारमंत्री, राज्यसभा सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली.

"शिसाका'ची स्थापना
शिरपूर सहकारी साखर कारखान्याची त्यांनी 1982 मध्ये स्थापना केली. जागतिक ऊस व बीट साखर उत्पादक महासंघाचे अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, अशा विविध पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे ते निकटवर्तीय सल्लागार म्हणून ओळखले जात. पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या पत्नी विद्याताई पाटील यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. शिवाजीराव पाटील यांच्यामागे अनिता देशमुख आणि गीता पाटील या दोन मुली, नातू तथा अभिनेता प्रतीक बब्बर असा परिवार आहे.

Web Title: shirpur nashik news shivajirao patil cremated tomorrow in shirpur