
Dhule Shiv Jayanti 2023 : शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची..! शहर- जिल्ह्यात अभिवादन
निमगूळ (जि. धुळे) : दोंडाईचा येथील श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती रोटरी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल व श्रीमती मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी, स्काउट-गाइड यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीस उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रमेश कुकरेजा प्रमुख पाहुणे होते.
विद्यार्थ्यांत शालेय जीवनापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श विचार व तत्त्वांची रुजवणूक होण्यासाठी अश्वारूढ बालशिवाजी व मावळ्यांच्या सजीव देखावा असणारी मिरवणूक रोटरी प्री-प्रायमरी स्कूलमध्ये प्राचार्य एम. पी. पवार व बतुल बोहरी यांच्या हस्ते सुरवात करून पारंपरिक वाद्यांचा गजरात काढण्यात आली. (Shiv Jayanti 2023 Greetings from city district dhue news)
शिवरायांच्या जयजयकारने पूर्ण परिसर दणाणून उत्साही वातावरणनिर्मिती केली. मिरवणूक रोटरी भवन, केशरानंद पेट्रोलपंप, श्रीराम मंदिर, निर्मल एम्पोरियममार्गे शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत नंदुरबार चौफुलीमार्गे रोटरी प्री-प्रायमरी स्कूल येथे सांगता करण्यात आली.
जागोजागी शाळेच्या विद्यार्थ्यांचे बॅंड, लेझीम, मलखांब, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी-काठी पथकांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण आकर्षणाचे केंद्र ठरले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बालकलाकारांनी जिजाऊ, शिवाजींचे सेनापती, मावळ्यांच्या भूमिकेत पारंपरिक वेशभूषा धारण करून मिरवणुकीत भाग घेतला. अश्वारूढ बालशिवाजींच्या भूमिकेत जश भोई होता.
प्रमुख पाहुणे रमेश कुकरेजा यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला. स्कूलचे अध्यक्ष हिमांशू शहा, प्राचार्य एम. पी. पवार, इन्चार्ज बतुल बोहरी, राकेश जयस्वाल, अनिश शहा, सचिन शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
मिरवणुकीदरम्यान स्काउट गाइ पथकाने गडकिल्ल्यांची पोस्टरद्वारे माहिती देऊन जागोजागी शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रबोधनपर संदेश दिला. मिरवणुकीत पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विजय पाटील, पंकज चोळके, राकेश अग्रवाल, डॉ. नितीन बिराडे, संजय अग्रवाल, मनोहर देवरे, जितेंद्र गिरासे हेही सहभागी झाले.
पालकवर्ग, शिवजयंती उत्सव समिती व रोटरी क्लबचे पदाधिकारी, नागरिक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गाइड कॅप्टन अंजना राजपूत, स्काउट अजय हजारे, गोपाल ढोले, जितेंद्र भदाणे, हरीश दानानी, जाफर मिर्झा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
मालपूर (ता. शिंदखेडा) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत विद्यार्थी व पारंपरिक वेशभूषेत मावळे. दुसऱ्या छायाचित्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादनप्रसंगी उपस्थित मान्यवर.
मालपूर शिवरायांना अभिवादन
दोंडाईचा : मालपूर (ता. शिंदखेडा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी अभिवादन करण्यात आले. सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान, ज्ञानोपासक माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्याने छत्रपतींचा पोशाख परिधान करून सजीव देखावा निर्माण केला होता. राज्यगीत, पोवाडा सादर करून जल्लोशात अभिवादन करण्यात आले.
या वेळी पंचायत समिती सदस्या पुष्पाकुंवर रावल यांच्या हस्ते सर्वप्रथम पूजन करून अभिवादन केले. सरपंच मच्छिंद्र शिंदे, उपसरपंच प्रतिनिधी अरुण धनगर, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी सरपंच वीरेंद्र गोसावी, लक्ष्मण पानपाटील, पोलिसपाटील बापू बागूल, लोटन इंदवे,
अॅड. पंकज पाटोळे, राजेंद्र कोळी, रवींद्र राजपूत, ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, तुकाराम पाटील, कैलास माळी, अजय साळवे, धनराज इंदवे, महेंद्र सोनवणे, भटू रावल, छगन बागूल, कैलास पाटील, अमित पवार, भालचंद्र खलाणे, ग्रामविकास अधिकारी टी. बी. साळवे, वीरेंद्र पवार, रिंकू सावंत, मुख्याध्यापक एस. एस. भलकार,
राजेंद्र चौधरी, जितेंद्र सोनवणे, हिलाल अहिरे, श्रीराम अहिरे, रमेश सावंत, रवींद्र रावल आदी उपस्थित होते. रवींद्र राजपूत यांनी प्रस्तावना व सूत्रसंचालन केले. उत्सव समितीचे हर्षवर्धन पुराणिक, रवींद्र बागूल, पंकज वाघ आदी शिवप्रेमींनी परिश्रम घेतले.
अमळथे येथे रक्तदान शिबिर
शिंदखेडा : तालुक्यातील अमळथे येथे राजे शिवराय सार्वजनिक वाचनालय व श्रीमती के. सी. अजमेरा रोटरी ब्लड सेंटर, धुळे यांच्यातर्फे शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व शिवचरित्रावर व्याख्यान झाले.
सचिन महाराज बोरकुंडकर यांनी व्याख्यान दिले. रक्तदान शिबिरत ३६ जणांनी रक्तदान केले. त्यात एका महिलेचा समावेश आहे. कार्यकमसाठी वाचनालयाचे अध्यक्ष महेंद्र पवार व सुनील पवार, विकास पवार, हर्षल पवार, सरपंच पूनम पवार, उपसरपंच विजयसिंग गिरासे, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले.
इस्कॉन, पालिकेतर्फे रंगभरण स्पर्धा
शिरपूर : येथील इस्कॉन व पालिकेतर्फे महाशिवरात्र आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १८) शहरातील सांदीपनी कॉलनी येथील टी.व्ही. टॉवर परिसरात रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. सुमारे १०० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराज व श्री शंकराचे प्रतिमापूजन करून स्पर्धेला सुरवात झाली. कार्यक्रमस्थळी किल्ला व त्यावर आरूढ शिवरायांची मूर्ती असा देखावा तयार करण्यात आला. स्पर्धेसाठी श्री शिवशंकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची रेखाटने देण्यात आली होती.
सहभागी विद्यार्थी शिवकाळातील विविध व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत उपस्थित होते. छत्रपती शिवराय, सोयराबाई, तानाजी आदींच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पालिकेतर्फे उपस्थितांना स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानाबद्दल माहिती देण्यात आली. इस्कॉनतर्फे प्रा. प्रशांत उदावंत व सहकाऱ्यांनी संयोजन केले.
भिंती झाल्या बोलक्या
एनएमआयएमएसच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींतर्फे टी.व्ही. टॉवरच्या संरक्षक भिंतीवर सुरेख चित्रे काढण्यात आली. पर्यावरण संवर्धन, मुली वाचवा-मुली शिकवा, स्वच्छता आदी विविध विषयांवर प्रबोधनात्मक चित्रे काढून त्यांनी भिंती बोलक्या केल्या. माजी नगराध्यक्षा संगीता देवरे व सहकाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
कासारेत वेशभूषेचे आकर्षण
कासारे : येथील बाजारपेठेत छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले व सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, अष्टप्रधान मंडळ व मावळे यांची वेशभूषा आकर्षण ठरली.
शिवतीर्थ स्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अष्टप्रधान मंडळ, मावळे आदी पोशाख परिधान केलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी, लेझीम, टिपरी पथकाने बाजारपेठेत विविध प्रात्यक्षिके करून दाखविली. मिरवणुकीदरम्यान शालेय वाद्ये व डीजेच्या तालावर विद्यार्थी थिरकले.
छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास जम्बो हार छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती व ग्रामपंचायतीतर्फे अर्पण करण्यात आला. गावातील शिवतीर्थ स्थळी शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा केली. अश्वारूढ राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेतील विद्यार्थिनीची गावातील मिरवणुकीदरम्यान महिलांनी आरती केली.
वेशभूषेतील छत्रपती शिवरायांना ग्रामस्थांनी अभिवादन करून चिमुकल्या विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. शिवजन्मोत्सव समिती व स्मारक समितीतर्फे वेशभूषा व विद्यार्थ्यांना बिस्किटवाटप करण्यात आले. खानदेश गांधी मेहता विद्यालय, बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला.------------------
शिवचरित्र जीवन जगण्याचा मार्ग डॉ. संतोष पाटील : सोनगीरला शिवव्याख्यान
सोनगीर : शिवचरित्र हे केवळ अभ्यासासाठी नव्हे तर जीवन जगण्याचा मार्ग आहे. शिव पाहावा, अभ्यासावा व अंगीकारावा. शिवरायांचे चरित्रातून मावळ्यांची स्वामीभक्ती व निष्ठा किती प्रखर होती हे दिसून येते. शिवरायांनी आई-वडिलांची सेवा नव्हे तर भक्ती केली.
असा राजा होणे नाही, अशी माहिती शिवव्याख्याते डॉ. संतोष पाटील यांनी दिली.येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त रथ चौकात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्याख्याते डॉ. पाटील यांचे व्याख्यान झाले.
त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी सरपंच वाल्मीक वाणी, माळी समाज अध्यक्ष भिका माळी, मोहन सैंदाणे, अर्जुन मराठे, डॉ. शशिकांत आपटे, देवीदास वाणी, दीपक माळी, प्रवीण बागूल, धुडकू माळी, अमित बागूल, देवीदास माळी, चूडामण माळी, अशोक धनगर उपस्थित होते. किशोर पावनकर यांनी प्रास्ताविक केले. सागर पटेल यांनी आभार मानले.
शिवजयंतीनिमित्त शनिवारी (ता. १८) सायंकाळी सातला सांस्कृतिक कार्यक्रम झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. रविवारी (ता. १९) शिवजन्मोत्सव व श्रींच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक, सकाळी प्रतिमापूजन व शोभायात्रा काढण्यात आली.
भगवे फेटे व शिवपताका हातात घेऊन गावातील प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा निघाली. पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, भाजपचे ज्ञानेश्वर चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड, अर्जुन मराठे, किशोर पावनकर, निखिल परदेशी आदी उपस्थित होते. सायंकाळी लेझर शो व जल्लोषात तरुणाई थिरकली.
दरम्यान, सार्वजनिक शिवजयंती उत्सवासोबतच घरोघरी शिवजयंती उत्सव साजरा व्हावा या हेतूने भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आर. के. माळी यांनी घरीच शिवरायांचा लहान अर्धपुतळा बसवून शिवजयंती साजरा करून अभिवादन केले.
या वेळी सरपंच रुखमाबाई ठाकरे, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, धाकू बडगुजर, पराग देशमुख, उपअभियंता हेमंत अहिरे, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, शिवनाथ कासार, डॉ. अजय सोनवणे, लखन ठेलारी, श्याम माळी, डॉ. राहुल देशमुख, पराग देशमुख, मोहन सैंदाणे, भटू धनगर, मोहनसिंग परदेशी, मनुकुमार पटेल, नितीन जैन, डॉ. युवराज नवटे, अनिल पाटील, सुरेश जाधव, प्रमोद धनगर आदी उपस्थित होते. एम. टी. गुजर यांनी सूत्रसंचालन केले.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनानी छत्रपती प्रदीप सावळे : पिंपळनेर महाविद्यालयात व्याख्यान
पिंपळनेर : शिवाजी महाराज एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनानी होते. प्रत्येक घरात महाराजांच्या विचारांचे पारायण झाले तर देश खऱ्या अर्थाने प्रगतिपथावर जाईल, असे प्रतिपादन महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा. प्रदीप सावळे यांनी केले.
येथील कर्मवीर आ. मा. पाटील कला, वाणिज्य आणि (कै.) अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. वाल्मीक शिरसाठ अध्यक्षस्थानी होतो. प्रभारी प्राचार्य के. डी. कदम व्यासपीठावर होते.
प्रा. सावळे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. माणसांची पारख करण्याची कला महाराजांच्या अंगी असल्यामुळे असंख्य तरुणांना स्वराज्य स्थापन करणेकामी प्रोत्साहित केले.
महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू वृत्तीचे होते. स्त्रियांच्या बाबतीत महाराजांचे विचार आधुनिक होते. शुद्धीकरणाची चळवळ ही महाराजांनी सुरू केली होती. शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक सुधारणा करून विविध योजनादेखील राबविल्या.
विद्यार्थिनी प्राची पाटील हिनेसुद्धा उत्स्फूर्तपणे शिवरायांविषयी भाषण केले. डॉ. शिरसाठ यांनी प्रोत्साहन गीत सादर केले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. चंद्रकांत घरटे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. योगेश नांद्रे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. उगलमुगले, प्रा. वसावे, डॉ. मस्के, प्रा, गवळी, शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मीकांत पवार, मनोहर बोरसे, संदीप अमृतकर, नरेंद्र ढोले, ताराचंद चौरे, कैलास जिरे, श्रीमती ठाकूरबाई, कुणाल कुवर, रखमाप्पा गवळी व विद्यार्थी उपस्थित होते.