सत्ता आमचीच; शिवसेना, भाजपचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

नाशिक - महापालिका निवडणुकीत मतदारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाल्यानंतर सर्वच पक्षांनी विजयाचे दावे केले आहेत. सत्तेची अपेक्षा असलेल्या शिवसेनेने आम्हालाच सत्ता मिळेल, असा दावा करत असतानाच भाजपने कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमावर विजय आमचाच असल्याचा दावा केला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकजुटीने निवडणूक लढविल्याने चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनसेने पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतपेटीतून मतदार आम्हालाच कौल देतील, अशी अपेक्षा पक्षाचे शहराध्यक्ष ऍड. राहुल ढिकले यांनी व्यक्त केली आहे. 

आज झालेल्या मतदानानंतर सर्वांच्या नजरा आता मतपेटीतून काय बाहेर पडेल, याकडे लागल्या आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाजपविरोधात रान उठविणाऱ्या शिवसेनेला बहुमताची अपेक्षा आहे. शहरात विविध पातळ्यांवर झालेल्या सर्वेक्षणात शिवसेनेला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्याचे स्पष्ट झाले असले, तरी शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा दावा केला आहे. शहरातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनीसुद्धा विजयाचा दावा केला असला, तरी त्यांच्या वक्तव्यातून भाजप बहुमताचा आकडा पार करेल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. मतांची टक्केवारी वाढली असती तर भाजपला बहुमतापर्यंत पोचता आले असते. प्रशासनाकडून मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याने मतांची टक्केवारी कमी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे; परंतु तरीही कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाच्या आधारे भाजप सत्तेत पोचेल, असा दावा आहे. मनसे, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे भाजप सत्तेत पोचेल. खरे म्हणजे, मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढू शकली नाही. मतदारयाद्यांमध्ये घोळ झाले नसते, तर मतदानाची टक्केवारी वाढली असती. 
-बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष, भाजप 
 
महापालिकेवर शिवसेनेचा भगवाच फडकणार. शहरभर सर्वत्र मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला. विरोधकांना मतपेटीतून याचे उत्तर मिळेल. सर्व विभागांत शिवसैनिकांनी चांगले काम केले. 
-अजय बोरस्ते, महानगरप्रमुख, शिवसेना 
 
महापालिकेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने एकजुटीने निवडणूक लढविली. आमच्या प्रामाणिक भूमिकेला नाशिककरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे निवडणूक आम्ही जिंकू, असा विश्‍वास आहे. 
-रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने चांगले काम उभे केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार चांगला निकाल नोंदवतील, अशी अपेक्षा आहे. मात्र अंतिम निकालासाठी सर्वांनाच दोन दिवसांची वाट पाहावी लागेल. 
-शरद आहेर, शहराध्यक्ष, कॉंग्रेस 

मनसेने गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांनी आम्हालाच कौल दिला असेल. जास्तीत जास्त जागा मनसेच्या वाट्याला येतील असा दावा आहे. 
-ऍड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष, मनसे 

Web Title: Shiv Sena, BJP claims