शिवसेनेच्या "वाघां'ना अद्याप डरकाळीच फुटेना 

शिवसेनेच्या "वाघां'ना अद्याप डरकाळीच फुटेना 

नाशिक - महापालिका निवडणुकीत विजय शिवसेनेचाच, अशी डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेच्या "वाघां'च्या डरकाळ्या बंद झाल्या आहेत. त्यातल्या त्यात इतर पक्षांतून शिवसेनेत प्रवेश करून निवडून आलेल्या नगरसेवकांना विजयानंतर पक्ष कार्यालयातून अभिनंदनाचे तर सोडाच पुढचे नियोजन काय राहणार, याबाबत विचारणादेखील न झाल्याने नवनिर्वाचित नगरसेवकांचे चित्त थाऱ्यावर नाही. 

निवडणुकीपूर्वी शिवसेनेचाच विजय होणार, अशा वल्गना मतदानयंत्रातून निघालेल्या निकालांनंतर फोल ठरल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजप राहील अशी शक्‍यता असताना अचानक मतदारांचा प्रथम कौल भाजपलाच असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. महापालिकेच्या सभागृहात शिवसेनेचे 35 नगरसेवक निवडून आले. निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी पूनम मोगरे, नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळी, संतोष गायकवाड, सीमा निगळ, प्रशांत दिवे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, प्रवीण तिदमे, हर्षदा गायकर, दीपक दातीर, सुदाम डेमसे, संगीता जाधव, श्‍यामकुमार साबळे-पाटील, भागवत आरोटे, चंद्रकांत खोडे व किरण गामणे हे सतरा नगरसेवक प्रथमच निवडून आले आहेत. सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, रमेश धोंगडे हे पूर्वीचे मनसेचे नगरसेवक यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आले आहेत. विद्यमान नगरसेविका संगीता जाधव यांचे पती अमोल जाधव पूर्वी कॉंग्रेसचे नगरसेवक होते. पूर्वी रिपाइंचे नगरसेवक असलेले संतोष साळवे यंदा शिवसेनेकडून निवडून आले आहेत. शिवसेनेला हा पराभव इतका जिव्हारी लागला, की नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना पक्ष कार्यालयातून अभिनंदनाचा एकही दूरध्वनी आला नाही. शिवाय पुढची दिशा काय असेल याबाबतही मार्गदर्शन होत नसल्याने शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांचा आनंद औटघटकेचा ठरताना दिसत आहे. विजयी झालेल्या नगरसेवकांपैकी ज्याला जसे जमेल त्याप्रमाणे मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जात आहे; परंतु ज्यांना "मातोश्री'चा पत्ता माहीत नाही किंवा तेथे पोचायचे कसे हे कसब नाही, त्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

अनुभवी नगरसेवकांत विसंवाद 
महापालिकेच्या सभागृहात अजय बोरस्ते, विलास शिंदे, मंगला आढाव, सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, सुनीता कोठुळे, केशव पोरजे, कल्पना पांडे, हर्षा व सुधाकर बडगुजर, दिलीप दातीर, दत्तात्रय सूर्यवंशी हे अनुभवी नगरसेवक आहेत. कोणीच कोणाच्या संपर्कात नसल्याने महापालिकेच्या सभागृहात एकजूट दाखविण्यापूर्वीच नगरसेवकांत विसंवाद असल्याचे दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com