शिवाजी, शंकर मार्केट "सील'! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

धुळे - व्यापारी गाळे, ओट्यांच्या भाड्यापोटी सुमारे तीन कोटी रुपये घेणे असल्याने महापालिकेने आज शहराच्या मध्यवर्ती भागातील व मोठी आर्थिक उलाढाल असलेले पाचकंदीलमधील शिवाजी व शंकर हे दोन मार्केट (व्यापारी संकुल) पूर्णतः, तर अन्य मार्केटमधील काही दुकानांना सील ठोकले. या धडक कारवाईमुळे व्यावसायिकांनी महापालिकेत धाव घेतली. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एकूण मागणीच्या 60 टक्के रक्कम अदा करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने उघडण्यात आली. 

धुळे - व्यापारी गाळे, ओट्यांच्या भाड्यापोटी सुमारे तीन कोटी रुपये घेणे असल्याने महापालिकेने आज शहराच्या मध्यवर्ती भागातील व मोठी आर्थिक उलाढाल असलेले पाचकंदीलमधील शिवाजी व शंकर हे दोन मार्केट (व्यापारी संकुल) पूर्णतः, तर अन्य मार्केटमधील काही दुकानांना सील ठोकले. या धडक कारवाईमुळे व्यावसायिकांनी महापालिकेत धाव घेतली. अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एकूण मागणीच्या 60 टक्के रक्कम अदा करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने उघडण्यात आली. 

महापालिकेच्या पथकांनी गेल्या दोन दिवसांपासून स्वमालकीच्या व्यापारी संकुलांतील गाळ्यांपोटी भाडे वसुलीकडे मोर्चा वळविला आहे. गाळे भाडेवसुलीच्या या प्रश्‍नाकडे "सकाळ'नेही लक्ष वेधले होते. महापालिकेच्या वसुली पथकाने आज पाचकंदील चौकातील महापालिकेच्या शिवाजी मार्केट, शंकर मार्केट, धान्य मार्केट, भाजी मार्केट येथे कारवाई केली. 

दोन मार्केट पूर्णतः सील 
पथकाने आज सकाळी शिवाजी मार्केट व शंकर मार्केट पूर्णतः सील केले. याशिवाय शिवाजी मार्केटबाहेरील आठ व शंकर मार्केटबाहेरील चार तसेच धान्य मार्केट व भाजी मार्केटमध्येही काही दुकानांना सील ठोकले. सहाय्यक आयुक्त त्र्यंबक कांबळे, बाजार विभागप्रमुख दिलीप कलाल, प्रदीप चव्हाण, एन. पी. सोनार, मधुकर निकुंभे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

व्यावसायिक महापालिकेत 
दोन व्यापारी संकुलांसह इतर दुकाने सील झाल्याने संबंधित व्यावसायिक महापालिकेत धडकले. सर्व व्यापाऱ्यांनी डिसेंबर 2014 अखेर भाडे अदा केलेले आहे, 2015 पासून महापालिकेनेच कर आकारणीची देयके न दिल्याने व्यापाऱ्यांना कराचा भरणा करता आला नाही. काही व्यापारी महापालिकेत कर भरण्यासाठी आलेले असताना त्यांच्याकडून कर स्वीकारला गेला नाही व आज अचानक महापालिकेच्या पथकाने थकबाकीदार दर्शवून अवाजवी दराने देयके देत आताच 50 टक्के रक्कम भरा, असे म्हणत दुकाने सील केली. प्रशासनाने योग्य कर आकारणी करून 2015 ते 31 मार्च 2017 पर्यंतची देयके शास्ती, दंड, व्याज न लावता द्यावीत, पंधरा दिवसांत तो कर भरू, दुकाने सील करू नयेत, अशी मागणी व्यावसायिकांनी केली. 

चर्चेअंती तोडगा 
व्यापाऱ्यांनी पाचकंदील परिसर व्यावसायिक व्यापाऱ्यांची सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून उपायुक्त रवींद्र जाधव यांना मागणीचे निवेदन देत चर्चा केली. रेडीरेकनर दराच्या दुप्पटऐवजी एकपट रकमेपैकी 60 टक्के रक्कम आता भरावी व उर्वरित रक्कम नंतर अदा करावी, असा तोडगा निघाल्यानंतर व्यापारी माघारी फिरले. सील केलेली दुकाने उघडण्याची कार्यवाही नंतर करण्यात येत होती. 

अशी आहे थकबाकी...! 
शिवाजी मार्केट... एक कोटी 56 लाख 
शंकर मार्केट... 56 लाख 66 हजार 668 
भाजी मार्केट... 45 लाख रुपये 

करार संपलेले ओटे, दुकाने 
शिवाजी मार्केट...68 ओटे (31 ऑक्‍टोबर 2013) बाहेरील 20 दुकाने (16 एप्रिल 2015) 
शंकर मार्केट...73 ओटे (2015) बाहेरील 18 दुकाने (14 डिसेंबर 2014) 
धान्य मार्केट...18 दुकाने (14 डिसेंबर 2014) 
भाजी मार्केट...25 दुकाने (16 एप्रिल 2015) 

Web Title: Shivaji, shanker market seal