दराडेंच्या विजयामुळे नांदगावातील शिवसेनेचे हौसले बुलंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नांदगाव : नाशिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विजयामुळे नांदगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे हौसले बुलंद झाले आहेत. मतदार संघातील सर्व सत्ता ताब्यात असणाऱ्या शिवसेनेसाठी दीड वर्षांनंतर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय दृष्ट्या जमेची बाजू ठरते का बघावे लागणार आहे. 

नांदगाव : नाशिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विजयामुळे नांदगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे हौसले बुलंद झाले आहेत. मतदार संघातील सर्व सत्ता ताब्यात असणाऱ्या शिवसेनेसाठी दीड वर्षांनंतर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय दृष्ट्या जमेची बाजू ठरते का बघावे लागणार आहे. 

येवला तालुक्याचा व नांदगावचा संबंध केवळ लगतचा तालुका एवढ्यापुरता नाही. पूर्वी तालुक्याचा दक्षिण भाग येवला विधानसभा मतदार संघाशी अनेक वर्षे संलग्न राहिला आहे. शिवाय लगतच्या तालुक्यातील राजकीय घडामोडीचा नांदगाववर होणारा परिणाम तसा अपरिहार्य असतो, याची चुणूक भुजबळ पितापुत्रांच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकदा दिसून आला आहे.  

येवल्याचे नरेंद्र दराडे विजयी होत असताना नांदगाव तालुक्यातील मनमाड नांदगाव या दोघं पालिकेतील नगरसेवकांचे मोठे पाठबळ दराडे यांना मिळाले आहे तालुक्याचे जावई ही अन्य बाब त्यात आहेच शिवाय दराडे व नांदगावचा संबंध तसा जुना नांदगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळाशी दराडे यांचा पक्षपातळी पलीकडचा अनेक वर्षाचा संबंध आहे .त्यामुळे दराडे यांच्या विजयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेची सर्व केंद्रे ताब्यात घेणाऱ्या शिवसेनेचे हौसले बुलंद ठरले तर वावगे वाटू नये. अर्थात सुहास कांदे यांची नांदगाव तालुक्याच्या सार्वजनिक क्षेत्रातील एंट्री त्यासाठी महत्वाची ठरली आहे. 

सुहास कांदे यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद येताच क्षणाला त्यांनी संघटनात्मक पुनर्बांधणी केली अन बदल दिसू लागला. मतदार संघात असलेल्या नांदगाव व मनमाड बाजार समित्या जिंकताना कांदे यांनी जिल्हा बँक त्यापाठोपाठ मनमाड-नांदगाव पालिका तालुका पंचायत समिती  अशी सगळी सत्ताकेंद्रे शिवसेनेला मिळवून दिली केवळ आमदारकीचा अपवाद राहिला आहे अन त्यासाठी त्यांची तयारी सुरु आहे त्यासाठी आतापावेतोच्या त्यांच्या नियोजनाला यशाने गवसणी घातली आहे. त्यामुळेच  आजच्या दराडे यांच्या विजयाने शिवसेनेचे पर्यायाने सुहास कांदे यांचे हौसले स्वाभाविकच बुलंद झाले आहेत. 

नांदगाव विधानसभा मतदार संघात असलेला दलित ओबीसी फॅक्टर लक्षात घेता दराडे यांच्या विजयामुळे कुठले व कसे राजकीय ध्रुवीकरणे आकाराला येतात का बघावे लागणार असले, तरी प्रस्थापित पुढाऱ्यांना मात्र काळजीत टाकले आहे.  विजयी झाल्यावर दराडे यांनी आपल्या विजयाला भुजबळांचे देखील बळ मिळाल्याचे सांगताना गुगली टाकली आहे ती महत्वाची आहे.

अर्थात भुजबळ यांच्याकडून बचावात्मक खुलासा त्यासाठी येणे बाकी आहे मात्र विधानसभेसाठी अवकाश असला तरी दराडे यांचा विजय सेनेच्या राजकीय वाटचालीला पोषक असा आहे हिरेबांधूनी ज्या पद्धतीने एड शिवाजी सहाणे यांच्या उमेदवारी साठी पुढाकार घेतला. त्याचा देखील परिणाम या मतदार संघात जाणवला. भुजबळांना डावलून काही करता येणार नाही अशी समर्थकांत असलेली चर्चा व ओबीसी फॅक्टर याचाही नांदगाव तालुकयातील विधानपरिषदेसाठी  असलेल्या साठ मतदारांवर परिणाम नाही म्हटला तरी दिसून आला होता या सर्व घडामोडीत झालेल्या परिणामांचे पडसाद काही काळ जाणवणार आहेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व विधानसभेसाठी भावी उमेदवार असलेल्या सुहास कांदे यांच्या समर्थकांना दराडे यांच्या विजयाने बळ मिळाले एवढे नक्की. 

Web Title: shivsena became strong due to darade s victory