शिवसेनेच्या निर्णयाची प्रतीक्षा - माधव भंडारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नाशिक - शिवसेनेतर्फे निर्णय जाहीर केल्यानंतर पुण्यासह मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्यासंबंधीची भूमिका दोन दिवसांमध्ये जाहीर केली जाईल. नाशिकमध्ये आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी नाशिकमध्ये आम्ही पूर्ण बहुमत मिळवू, असा दावाही त्यांनी आज केला.

विधान परिषदेच्या पाच, महापालिकेच्या दहा आणि जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारी यांनी पक्षाच्या वसंत-स्मृती कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. नाशिक, पुणे, मुंबई स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेना करत आहे, त्याबद्दल भाजपची भूमिका काय? या प्रश्‍नाला त्यांनी वरील उत्तर दिले. प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रा. सुहास फरांदे, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

शिवसेनेला आम्ही मित्रपक्ष मानतो. रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष हे सगळे मित्रपक्ष आमच्यासमवेत आहेत, असे सांगून भंडारी म्हणाले, की ग्रामीण भागात युती करण्याचे अधिकारी स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. मित्रपक्षांखेरीज कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादीसमवेत समझोता होणार नाही.

पहिल्या क्रमांकावर राहू
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप चौथ्या स्थानावर होता. निम्म्याहून अधिक जिल्हा परिषदांमध्ये पक्षाचे प्रतिनिधित्व नव्हते. पण आताच्या महापालिका निवडणुकीत नगरपालिकांप्रमाणेच आम्ही पहिल्या क्रमांकावर राहू. जिल्हा परिषदेमध्ये मोठे स्थान प्राप्त केले जाईल. विधान परिषदेच्या आताच्या तीन जागा पुन्हा मिळवत आणखी एक जागा खेचून आणू, असाही दावा भंडारी यांनी केला आहे. "भाजपला मत म्हणजे विकासाला मत,' ही भूमिका घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: shivsena decission waiting