नाशिकची शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना लढवणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

येवला - ''मी तुमच्यावर रागावलो पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर प्रेम करत नाही. नाशिकचा विजय हा शिवसेनेतील सर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. सर्वांचे अभिनंदन'', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीम नाशिकचे कौतुक केले. नाशिक शिक्षक विधानपरिषदेची जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा करत ''एकत्रित लढा..कामाला लागा'', असे आदेशही ठाकरे यांनी सांगितले.

येवला - ''मी तुमच्यावर रागावलो पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर प्रेम करत नाही. नाशिकचा विजय हा शिवसेनेतील सर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. सर्वांचे अभिनंदन'', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीम नाशिकचे कौतुक केले. नाशिक शिक्षक विधानपरिषदेची जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा करत ''एकत्रित लढा..कामाला लागा'', असे आदेशही ठाकरे यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नाशिक विधानपरिषदेच्या जागेवर शिवसनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे. या विजयानंतर नाशिकसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकार्यांनी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी दराडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी,आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, योगेश घोलप, सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, सचिन मराठे, महेश बिडवे, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, उदय सांगळे, येवल्यातील नेते संभाजी पवार, जिल्हा बँक संचालक किशोर दराडे, डॉ.सुधीर जाधव, दत्तात्रय वैद्य, वाल्मिक गोरे, कुणाल दराडे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  

यावेळी भुसे व दराडे यांना ठाकरे यांनी जवळ बसवून घेत नाशिकच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. एकजुटीने निवडणुकांना सामोरे गेलो तर मते कमी असतांना विजय मिळवणे कठीण नसल्याचे या निकालाने दाखवले आहे. आपल्याला इतर पक्षाशी घेणे नसून, आपण आपली ताकद दाखवायला राज्यात सुरुवात केली आहे. या विजयाने उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची लाट सुरु झाली असून, विधानसभेवर भगवा फडकणारच असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान दराडे, भुसे, वाजे आदिंनी खा.राऊत यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी दराडे व भुसे यांचे कौतुक करत सर्वांच्या योगदानाचे कौतुक केले.

‘शिक्षकां’साठी दराडे परिवारासोबत गुफ्तगू
नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या जागेसाठीची निवडणूक जाहीर झाली असून, यासाठी इतर पक्षासह इच्छुकांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. भाजपाने या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. आता शिवसेनाही या आखाड्यात उतरणार असून, उद्यापर्यत उमेदवार जाहीर होण्याचे संकेत मिळाले आहे. या जागेवर लढण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक व दराडे यांचे लहान बंधू किशोर दराडे हे इच्छुक आहेत. याप्राश्वभूमिवर ठाकरे यांच्यासोबत आज दराडे परिवाराची चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंबरोबरच खा.संजय राऊत, श्री.भुसे, संपर्कप्रमुख चौधरी, मिलिंद नार्वेकर, नरेन्द्र दराडे, किशोर दराडे व रामदास दराडे व कुणाल दराडे यांच्यात याविषयावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. आपली इच्छा बोलून दाखवली असली तरी दराडे यांनी वेळ मागितल्याचे समजते. त्यामुळे येत्या दोन दिवसांत नाशिकच्या जागेबाबत शिवसेना आपली भूमिका निच्छित करेल असे दिसते.

Web Title: Shivsena in Nashik teacher's matadarsangh