सटाण्यात शिवसेनेकडून पेट्रोल, डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ रस्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पेट्रोल, डीझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. या सर्व महागाईला केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप शिवशेनेने केला.

सटाणा - पेट्रोल, डीझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. वाढत्या महागाईत सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. या सर्व महागाईला केंद्रातील भाजप सरकारच जबाबदार असल्याचा आरोप शिवशेनेने केला. त्याचबरोबर 'भाजप सरकार हाय हाय' च्या घोषणा देत बागलाण तालुका व सटाणा शहर शिवसेनेतर्फे आज बुधवार (ता.२३) रोजी येथील बसस्थानकासमोरील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर वाहनाची तिरडी रचून तब्बल तासभर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाद्वारे राज्यात आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मित्रपक्ष भाजपला घरचा आहेर दिला आहे. आज सकाळी ११ वाजता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे व तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात एकत्रित आले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'भाजप सरकार हाय हाय', 'पेट्रोल व डीझेलची दरवाढ मागे झालीच पाहिजे', 'बहोत हो गई मेहंगाई की भरमार, अब तो बस करो मोदी सरकार', 'महागाई वाढविणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो', 'शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे' अशी घोषणाबाजी सुरु केली.

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकी वाहनाची तिरडी रचून त्यावर पुष्पहार अर्पण केला. महामार्गावरील वाहने अडवून रास्ता रोको आंदोलन सुरु केले. यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल दर वाढविल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. 
आंदोलनात माजी शहरप्रमुख शरद शेवाळे, विक्रांत पाटील, मुन्ना सोनवणे, अमोल पवार, सचिन सोनवणे, राजनसिंह चौधरी, महेश सोनवणे, भाऊसाहेब नांद्रे, मंगलसिंग जोहरी, शेखर परदेशी, शिव जयप्रकाश सोनवणे, दिलीप शेवाळे, निरंजन बोरसे, किरण अहिरे, दुर्गेश विश्वंभर, साखरचंद बच्छाव, सुभाष नंदन, बापू कर्डीवाल, समीर शेख, सागर पगार, जीवन गोसावी, रवींद्र जाधव, शुभम सोनवणे, आनंदा लाडे, महेश सोनवणे, राजू जगताप, संदीप कसबे, ललित सोनवणे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिवसेनेतर्फे आज सकाळी अचानक छेडण्यात आलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. सध्या सटाणा व नामपूर बाजार समित्यांची निवडणूक सुरु असल्याने प्रशासकीय अधिकारी निवडणूक प्रक्रियेत व्यस्त आहेत. रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेऊन वाहतूक सुरळीत करावी अशी सूचना पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली. मात्र जोपर्यंत तहसीलदार निवेदन घेण्यास येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली. अखेरीस नायब तहसीलदार विनोदकुमार चव्हाण यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. 

देशात सर्वत्र महागाई गगनाला भिडलेली असताना 'मन की बात' करणारे पंतप्रधान संसदेत उत्तर देण्याऐवजी प्रचारकी थाटात भाषणे करीत आहेत. त्यामुळे आता महागाईला विटलेली जनताच या सरकारला महागलेल्या इंधनामध्ये जाळेल, असेही लालचंद सोनवणे यावेळी म्हणाले. तसेच डॉ.प्रशांत सोनवणे यांनीही बोलताना भाजपवर टीका केली.

Web Title: Shivsena protesting against petrol and diesel prices