पेठ तालुक्‍यात शिवसेनेचा भगवा; दोन्ही गट व चार गणांत मिळविला विजय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

पेठ - जिल्हा परिषदेच्या दोन गटांत आणि पंचायत समितीच्या चार गणांत शिवसेनेने सर्व जागा जिंकत निर्विवाद बहुमत सिद्ध केले.

पेठ - जिल्हा परिषदेच्या दोन गटांत आणि पंचायत समितीच्या चार गणांत शिवसेनेने सर्व जागा जिंकत निर्विवाद बहुमत सिद्ध केले.

धोंडमाळ गटात शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख भास्कर गावित यांनी 9753 मते मिळवत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इंद्रजित गावित यांचा 2109 मतांनी पराभव केला. इंद्रजित गावित यांना 7644 मते मिळाली. तालुक्‍यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पानिपत झाले असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने तालुक्‍यात घेतलेली आघाडी हा चर्चेचा विषय ठरला आहे. कोहोर गटात भास्कर गावित यांच्या स्नुषा आणि बाजार समितीचे सभापती श्‍यामराव गावित यांच्या पत्नी व धोंडमाळ गटाच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हेमलता गावित यांनी 8317 मते मिळवत भगवा फडकविला. त्यांनी मनसेच्या देवता राऊत यांचा 1944 मतांनी पराभव केला. राऊत यांना 6373 मते मिळाली. धोंडमाळ गणात शिवसेनेचे तुळशीराम वाघमारे यांनी 4899 मते घेत "राष्ट्रवादी'चे गिरीश गावित यांचा 1290 मतांनी पराभव केला. गावित यांना 3228 मिळाली. सुरगाणा गणात शिवसेनेचे विलास अलबाड यांना 4416 मते मिळाली; तर प्रतिस्पर्धी भाकपचे नामदेव मोहंडकर यांना 4014 मते मिळाली. त्यांना 402 मतांनी पराभवास सामोरे जावे लागले. कोहोर गणात शिवसेनेच्या पुष्पा पवार 3999 मते मिळून विजयी झाल्या. प्रतिस्पर्धी उमेदवार "राष्ट्रवादी'च्या लंकाबाई डगळे यांनी 3515 मते मिळवत कडवी झुंज दिली.

करंजाळी गणातील निवडणूक अटीतटीची होईल, असा व्होरा असताना शिवसेनेच्या पुष्पा गवळी 4854 मते मिळवत विजयाची माळ गळ्यात पाडण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी "राष्ट्रवादी'च्या अनिता गवळी व मनसेच्या ललिता वाघमारे यांचा समान मतांनी पराभव केला. गवळी व वाघमारे यांना 3257 मते मिळाली. करंजाळी गणात राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभवास तिकीट कापाकापीचे राजकारण कारणीभूत ठरले.

Web Title: Shivsena won in Peth taluka