नांदगाव: रस्ते दुरुस्तीसाठी 'शोले-स्टाईल' आंदोलन करणार्‍यांना रोखले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नांदगाव : तालुक्यातील रस्त्याच्या प्रश्नांवर शोले स्टाईल आंदोलन करू पाहणाऱ्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नांदगाव तालुक्यातील तळवडे येथील युवकाचा गेल्या आठवड्यात अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्त्याचे काम अर्धवट सोडून देणाऱ्या ठेकेदाराला दोषी धरून त्यांच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. महत्त्वाच्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावावेत, शनी मंदिराजवळील प्रमुख रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे, नांदगाव-वेहेळगाव रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आदी मागण्यासाठी हे आंदोलन झाले.

या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश चव्हाण, विशाल वडघुले यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीच्या वतीने येथील नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या पाण्याच्या उंच टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात येणार होते. मात्र पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कार्यकर्त्यांना टाकीवर चढू देण्यापूर्वीच ताब्यात घेतले.

तथापि आंदोलनकर्त्याचे गाऱ्हाणे निवासी नायब तहसीलदार मीनाक्षी बैरागी, पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी ऐकून घेत मागण्यांचे निवेदन स्वीकारले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता भावसार यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासनांचे पात्र दिले. त्यात तळवाडे रस्त्यावर झालेल्या अपघाताबाबत विभागीय कार्यालयाला सादर केलेल्या अहवालाची माहिती देण्यात येऊन अधिक चौकशी करण्याचे तसेच दिशादर्शक फलकाबाबत अंदाजपत्रकीय तरतूद करण्याची लेखी हमी देण्यात आली.

तालुका अध्यक्ष विशाल वडघुले, जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष सुमित गुप्ता, सामाजिक कार्यकते संजय मोकळ, प्रवीण नंनावरे, विलास पवार, विकास गवळी, परसराम  शिंदे, बाळानाथ पवार, देविदास देवरे, निलेश चव्हाण, सुनील आहेर, राहुल जाधव, महेंद्र झाल्टे, मेजर जगन्नाथ साळूके, किरण गवळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Web Title: Sholey Style protests by AAP in Nandgaon