चिलारेत गोळी झाडून बिबट्याची शिकार?

सचिन पाटील
मंगळवार, 5 जून 2018

शिरपूर - चिलारे (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू धारदार हत्याराचा वार आणि बंदुकीतून झाडलेल्या गोळीमुळे झाला. ते शवविच्छेदनात स्पष्ट झाले. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू शेतकऱ्यांनी केलेल्या प्रतिकारात झाला, की त्याची शिकार झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रश्नी वन विभागाने अबोला धरला आहे. 

बिबट्याचा कथित हल्ला
चिलारे येथील शेतात दोन जूनला दुपारी बिबट्याच्या कथित हल्ल्यात कालुसिंग महारू पावरा, पोपट सुरसिंग पावरा, महेंद्र जतन पावरा जखमी झाले. वन विभागाच्या पथकाने शोध घेतला असता सुळे- चिलारेच्या सीमेवर जंगल क्षेत्रात बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याचे शिरपूर येथे शवविच्छेदन झाले.

शरीरात बंदुकीची गोळी
बिबट्याच्या पाठीवर खोलवर प्राणघातक शस्राची जखम, शरीरात बंदुकीची गोळी आढळली. शवविच्छेदनानंतर त्याचे दहन झाले.

बंदूक आली कुठून? 
बिबट्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी घटनास्थळी बंदूक कुठून आली, तिचा परवाना होता का, असे प्रश्न आहेत. बिबट्याचे प्राण घेणारी गोळी कोणी झाडली, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. बिबट्याने घटनास्थळापासून जवळ नाल्यात एका गायीची शिकार केली होती. त्यामुळे मांसाचा उर्वरित भाग खाण्यासाठी तो परत येईल हे ठाऊक असल्याने त्याच्या शिकारीचा डाव रचला गेला की काय, अशी शक्‍यताही आहे. 

वन विभागाची कोंडी 
बिबट्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित जमावाविरुद्ध गुन्हा दाखल होणे अटळ आहे. बिबट्याच्या मृत शरीराच्या अवस्थेवरून त्याचा मृत्यू नैसर्गिक नाही, हे उघड होते. त्यामुळे पोलिसांना वेळीच माहिती देणे आवश्‍यक होते. मात्र, शवविच्छेदन, त्याचा अहवाल अशा तांत्रिक बाबींना महत्त्व देत मृत शरीराची विल्हेवाट लावल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत वनक्षेत्रपाल पी. डी. खैरनार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

Web Title: shot a pistol and leopard hunting in chilare